महिला बचत गटांंचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार'

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने सन २०२५-२६ या विद्यमान आर्थिक वर्षामध्ये कर संकलन वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आत्तापर्यंत २१२ कोटींचा कर संकलित केला आहे.

महापालिकेने यावर्षी आजतागायत २ लाख मालमत्ताधारकांना बिलांचे घरपोच वाटप केल्याने, मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी पुढाकार घेऊन बिलावरील ३० जूनपर्यंत असलेल्या १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे.

यावर्षी बचत गटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन आणि अद्ययावतीकरण, मालमत्ताकर भरण्यासाठी डिजीटल पध्दतीचा स्वीकार, मालमत्ताकराबाबत शंका निरसन आणि बिल मिळण्यासाठी व्हॉटस्‌ॲप चॅटबॉट आणि मालमत्ताकरावर १० टक्क्यांची सवलत योजना अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक सेवा सुलभतेने उपलब्ध करुन दिल्याने करदात्यांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण आलेली नाही.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखाहून अधिक मालमत्ता असून, मालमत्ताधारकांनी कर भरुन १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील मालमत्ताधारकांना पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच बिल मिळाल्याने, तसेच मालमत्ताकर भरण्यासाठी डिजीटल पध्दतीला पसंती दिल्याने कर संकलनाला गती मिळाली आहे.

बचत गटांच्या महिलांना मिळाला रोजगार; ‘दुहेरीे' लाभ...

मालमत्ताकर विभागाने या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला. बचत गटांच्या महिलांना मालमत्ताकराचे बिल वाटप तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहितीचे संकलन आणि अद्ययावतीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या कामासाठी त्यांना प्रतिबिलासाठी योग्य मानधन दिल्याने महिलांना बिल वाटपातून रोजगार निर्माण होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी विभागाने दिली. यातूनच बिलांचे शंभर टक्के वाटप शक्य झाले. त्याचबरोबर या अभिनव उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी फक्त ३० दिवसातच निम्म्याहून अधिक मालमत्तांपर्यंत बिले पोहोचल्याने, कमी कालावधीत तब्बल २१२ कोटींचा कर संकलित करण्यात आला आहे.

एका क्लिकवर मालमत्तेबाबत ‘एसएमएस” द्वारे माहिती @NMMC वरुन येणाऱ्या एसएमएसवरील लिंक उघडावी...

महापालिकेने यावर्षी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे मालमत्ता धारकांना ‘एसएमएस'द्वारे कर भरण्याचे आवाहन करण्यात आले, ज्यास मालमत्ताधारकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. महापालिकेने यावर्षी मालमत्ता धारकांची माहिती संकलन आणि अद्ययावतीकरण (KYC) केल्याने, आता मालमत्ता धारकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर मालमत्तेबाबतची माहिती मिळणार आहे. नागरिकांना महापालिकेच्या '@NMMC' या हॅण्डलवरून येणाऱ्या एसएमएस वरीलच लिंक उघडावी, असे आवाहन मालमत्ताकर विभागाकडून करण्यात आले आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नाही, अशा मालमत्ताधारकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

प्रभावी जनजागृती; सकारात्मक प्रतिसाद...

या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी डिजीटल प्रक्रियेची उपलब्धता सोशल मिडीया आणि इतर माध्यमांतून करदात्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. यामध्ये होर्डिंग्ज, डिजीटल बोर्ड, जाहिराती, तसेच शहरातील प्रत्येक सिग्नलवर आवाहनपर जिंगल्स यांचा समावेश होता. यामुळे मालमत्ताधारकांपर्यंत १० टक्क्यांच्या सवलतीची माहिती पोहोचवून जागरुकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला. या जनजागृतीस मालमत्ताधारकांनी कर भरून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ऑनलाईन बिलासाठी व्हॉटस्‌ॲप ‘चॅटबॉट'...

ऑनलाइन स्वरुपात बिल उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने व्हॉटस्‌ॲप ‘चॅटबॉट' सुरु केला आहे. मालमत्ताधारकांनी ८२९१९२०५०४ या क्रमांकावर इंग्रजीमध्ये 'Hi'  असा संदेश पाठवून, फक्त चार सोप्या पायऱ्यांमध्ये माहिती भरल्यास त्यांना आपले बिल मिळते. त्यामुळे तात्काळ मालमत्ताकराचा भरणा करुन सवलतीचा लाभ घेता येतो. त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मालमत्ताकर विभागाकडून करण्यात आले आहे.

१० % सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन...

नवी मुंबई महापालिका नेहमीच नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कटीबध्द आहे. नागरिकांना मालमत्ताकर देयक प्राप्त करून घेणे आणि त्याचा भरणा करणे सुलभ जावे याकरिता विभागामार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच ऑनलाईन पेमेंटचे वेबसाईट, पोर्टल, डेबीट कार्ड, क्रेजिट कार्ड, जीपे-फोन पे-पेटीएम असे एका क्लिकवर पेमेंट करण्याचे अनेक युपीआय पर्याय याच लोकाभिमुख कार्यप्रणालीचा एक महत्वाचा भाग आहेत. यामध्ये महिला बचत गटांच्या सहभागातून झालेले बिल वाटप असो तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे होत असलेले माहिती संकलन, यातून आपण एक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रणाली तयार करीत आहोत. तसेच ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आलेली १० % सवलत आणि व्हॉटस्‌ॲप चॅटबॉट सारख्या सुविधांमुळे करदात्यांना अत्यंत सोयीस्कर पध्दतीने आपले कर्तव्य पार पाडता येणार आहे. या डिजीटल उपक्रमांचा करसंकलनावर सकारात्मक परिणाम दिसत असून, याचा फायदा शेवटी शहराच्या विकासासाठीच होणार आहे. सर्व करदात्यांनी या सवलतीचा आणि सुविधांचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ताकराचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
- डॉ.कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईची पाण्याची तहान भागवण्यासाठी सिडकोचे धोरणात्मक जलनियोजन