पनवेल महापालिकेची डॅशिंग नारी; अमेरिकेत ठरली सर्वात भारी
पनवेल : पनवेल महापालिका अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे संपन्न झालेल्या २१ व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी शुभांगी घुले यांचे विशेष अभिनंदन केले.
अल्बामा, अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले यांनी भारत देशाच्या संघात सहभागी होऊन २१ व्या जागतिक पोलीस-अग्निशमन स्पर्धेत अल्टीमेट फायर फायटींग चॅलेंज या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्वल केले.
या स्पर्धेतील शुभांगी घुले यांचा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. अल्बामा येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धा अग्निशमन, पोलीस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून ५० देश सहभागी झाले होते. शुभांगी घुले यांनी इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपला जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कांस्य पदक प्राप्त केले.
याआधी एप्रिल महिन्यात नवी दिल्ली येथे त्यागराज स्टेडियमवर झालेल्या ऑल इंडिया नॅशनल फायर सर्व्हिस स्पोर्टस् कंट्रोल बोर्डाच्या वतीने थर्ड इडिएशन ऑफ ऑल इंडिया फायर सर्व्हिसेस स्पोर्टस् ॲन्ड फायर सर्व्हिसेस मीट-२०२५ मध्ये थाळीफेक आणि गोळा फेक या दोन्ही खेळामध्ये अग्निशामक शुभांगी घुले यांनी सुवर्ण पदक मिळवले होते.
या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. माझ्यासाठी माझ्या प्रशिक्षकांचा आणि कुटुंबियांचा, महापालिकेचा पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. यापुढेही मी अधिक मेहनत करुन शहराचे आणि भारताचे नाव उच्च ठरवण्याचे काम करीन, अशी प्रतिक्रिया शुभांगी घुले यांनी दिली आहे.