क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून घडणार गुणवत्ताधारक खेळाडू -ॲड. आशिष शेलार
पनवेल : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था एक नंबर आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर या रत्नपारखी व्यक्तिमत्त्वाची निवड अगदी अचूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील. तसेच महापालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडुंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान-सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पनवेल येथे व्यक्त केला.
पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन २७ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ॲड. शेलार बोलत होते.
यावेळी ‘भारतीय क्रिकेट संघ'चे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर, खासदार श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील, आ. महेश बालदी, ‘सिडको'चे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, ‘रायगड क्रिकेट असोसिएशन'चे अध्यक्ष अनिरुध्द पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, ‘सिडको'चे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शुभारंभाची फित कापल्यानंतर सर्व मान्यवरांनी क्रिकेट पीच आणि क्रिकेट साहित्याचे पुजन करून उपस्थित मुलांसोबत क्रिकेट खेळून अकादमीची प्रत्यक्ष सुरुवात केली.
पनवेलकर भविष्यात भारतीय क्रिकेट संघात - पद्मश्री दिलीप वेंगसरकर
पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडुंमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट दिसून येते. सदर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे या खेळाडुंना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटुंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पद्मश्री वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील क्रिकेटपटूंना उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
तरुण पिढीमध्ये नवभारत घडवण्याची ऊर्जा आहे. याच संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. या केंद्रातून मुलांचे भविष्य घडेल. तसेच पनवेल महापालिका हद्दीतील विविध विभागांमध्ये टेनिस कोर्ट, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आणि इतर खेळांचे क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत, असे परेश ठाकूर म्हणाले.
आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रास्ताविकातून माहिती देताना सदर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
सदर कार्यक्रमात पनवेल परिसरातील क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू आणि मान्यवर प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक, महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरुप खारगे, सहायक आयुक्त श्रीराम पवार, डॉ. रुपाली माने, सुबोध ठाणेकर, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी मानले.