रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी २० मे डेडलाईन
घोडबंदर रोडवरील कामांची पाहणी, अधिकाऱ्यांसमवेत ‘टीएमटी'तून प्रवास
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह केली. घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामे २० मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरु करावेत. तसेच जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत, अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या यंत्रणांना दिले.
पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरु असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने २४ एप्रिल रोजी पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, ‘मेट्रो'चे अधीक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, ‘एमएमआरडीए'चे अधिकारी, मेट्रो, महावितरण आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळा लक्षात घेवून पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने घोडबंदर रस्त्यावर सुरु असलेल्या कामांची पाहणी दर चार आठवड्यांनी करीत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या पाहणी दौऱ्यास ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित असून कालबध्द पध्दतीने कामाचे नियोजन करुन त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. मान्सून अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी, असा मुख्य हेतू असून त्या अनुषंगाने सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचे आयुवत राव यांनी सांगितले.
कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागाची पाहणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने सद्यस्थितीत सुरु असलेली कामे जलगदतीने पूर्ण होत असून रस्ते काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, जलवाहिनी टाकणे, मलनिःस्सारण वाहिन्या बदलण्याची सर्व कामे २० में पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिल्या. तसेच ‘मेट्रो'च्या ज्या ठिकाणची कामे झाली आहे, अशा ठिकाणी पडलेले बॅरीगेटस्, पाईपलाईन, डेब्रीज आणि इतर साहित्य ज्याची आवश्यकता नाही असे साहित्य तातडीने उचलण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या.
कलव्हर्ट डीप क्लिनींगचे काम...
पावसाळ्यात गटारे, नाल्यामुळे रस्तयावर पाणी येणार नाही, या दृष्टीने कलर्व्हटचे डीप क्लिनींगचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी स्वतः कार्यकारी अभियंता याची पाहणी करणार आहेत. घोडबंदर रोडवर जुन्या झालेल्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम सुरु आहे. नवीन ड्रेनेज लाईन टाकताना त्या जुन्या ड्रेनेजशी जोडल्या गेल्या आहेत की नाही याची काळजी घेणे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडणार नाही या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या.
उड्डाणपुलाचे काम २० मे पर्यत पुर्ण करावे.
कासारवडवली आणि भाईंदरपाडा येथील उड्डाणपुलाचे काम देखील प्रगतीपथावर सुरु आहे. दोन्ही उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुले झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची उर्वरित कामेही २० मे पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले ‘महावितरण 'चे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले.
आयुक्तांचा टीएमटी बसमधून पाहणी दौरा...
घोडबंदर रोडवर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून पाहणी दौरा करताना अधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये यासाठी सदर पाहणी दौरा सर्व ‘प्राधिकरण'च्या अधिकाऱ्यांसमेवत परिवहन सेवेच्या बसेसमधून केला असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
दरवर्षी पावसाळ्यात ज्या रस्त्यांवर खड्डे पडतात, अशा ठिकाणांची पाहणी करुन त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. घोडबंदर रोडवर विविध कामे एकाच वेळी सुरु आहेत. त्यामुळे कामे प्रगतीपथावर सुरु असून ती लवकरच पूर्णत्वास जातील. नागरिकांनी देखील सहकार्य करुन वाहतुकीचे नियम पाळावेत. मार्शलच्या सूचना ऐकाव्यात. विरुध्द दिशेने वाहने चालवू नयेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वच प्राधिकरण प्रयत्न करीत असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.