नवी मुंबईमध्ये ५०१ धोकादायक इमारती महापालिकातर्फे यादी जाहीर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२५-२०२६ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण ५०१ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करणे अशा सी-१ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५१ इमारती तसेच इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे अशा सी-२ ए प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या १०४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा सी-२ बी प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या २९७ इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरूस्ती या सी-३ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ४९ इमारती, अशाप्रकारे एकूण ५०१ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.
सदर यादी नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर विभाग सेक्शनमध्ये अतिक्रमण विभाग माहितीच्या सेक्शनमध्ये सामान्य माहिती या अंतर्गत अवलोकनासाठी सहज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी-१ प्रवर्गामध्ये नमूद ५१ इमारतींची नावे आणि तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक, भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी-वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी-वाणिज्य वापर तात्काळ थांबविण्याबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांच्याकडील ५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना, नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सी-१ प्रवर्गातील इमारतीची विद्युत आणि जलजोडणी खंडीत करण्यात येईल, असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
अशा धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जीवित आणि वित्त हानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा, बांधकामाचा निवासी-वाणिज्य वापर त्वरित बंद करावा आणि सदरची इमारत, बांधकाम विनाविलंब तोडून टाकावे, असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास सदर इमारत, बांधकाम कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील. नवी मुंबई महापालिका यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्टपणे सूचित करण्यात आलेले आहे.
सदर नोटिसीमध्ये धोकादायक इमारतींच्या नावासमोर रहिवास वापर सुरु आहे अथवा नाही याचीही नोंद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर, रहिवास करणाऱ्या नागरिकांनी इमारत तात्काळ निष्कासीत करावयाची आहे किंवा वर्गीकरणानुसार नमूद केल्याप्रमाणे इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या भोगवटाधारकांनी इमारत दुरुस्त करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घरांचा रहिवास, वापर तात्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील, असेही महापालिका तर्फे नमूद करण्यात आले आहे.