ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात ‘श्रमजीवी'चे उपहासात्मक आंदोलन

भिवंडी : तालुक्यातील ग्रामीण मधील मोहिली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महेंद्रसिंग राठोड यांच्या कारभाराविरोधात ‘श्रमजीवी'च्या वतीने उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘श्रमजीवी'च्या तारामती जाधव आणि संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात गुलमोहरच्या फुलांचा गुच्छ देत वाजत-गाजत आदर्श अधिकारी पुरस्कार ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आला.
या आंदोलनावेळी ‘श्रमजीवी संघटना'चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सागर देसक, तालुका अध्यक्ष आशा भोईर, तालुका सचिव विश्वनाथ पासारी, महापोली गटाचे अध्यक्ष दयानंद पाटील, दाभाड गणाचे सचिव विनोद गावित, प्रदीप मांजरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिली ग्रामपंचायत हद्दीत वावल्याची वाडी आणि बोरीची वाडी या भागात मोठ्या प्रमाणावर कातकरी समाजाची वस्ती आहे. मात्र, या वस्तीतील नागरिक आजही पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्याचबरोबर आधारकार्ड, वनजमीन दावे, जातीचे दाखले, रेशनकार्ड, घरकुल यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबित असतानाही ग्रामपंचायत अधिकारी महेंद्रसिंग राठोड त्यांच्या ठरलेल्या दिवशी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचा आरोप आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नमुंमपाच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार