तुर्भे ट्रक टर्मिनल पार्किंगमध्ये भीषण आग; 7 ट्रक आणि 1 जेसीबी जळून खाक
नवी मुंबई : रविवारी 6 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तुर्भे सेक्टर-20 मधील ट्रक टर्मिनल पार्किंग परिसरात मोठी आग लागण्याची घटना घडली. पुठ्ठयाचे बॉक्स आणि फ्लास्टिक क्रेट्स साठवलेल्या जागेपासून सुरुवात झालेली ही आग काही क्षणांतच भीषण रुप धारण करत ट्रक पार्किंग परिसरात फैलावली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात झाले असून, एकूण 7 ट्रक आणि 1 जेसीबी वाहन पूर्णत: जळून खाक झाले आहेत.
या आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या 6 गाडया आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या 2 गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करुन पहाटेच्या सुमारास येथील आग नियंत्रणात आणली. येथील आग धुमसत असल्याने अग्निशमन दलाकडून सोमवार दुपारी पर्यंत घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु होते. खबरदारीचा उपाय म्हणून पार्किंगमधील इतर वाहने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत.
सदर आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांकडून आणि अग्निशमन विभागाकडून त्याबाबत तपास सुरु असून आग लागण्यामागचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाने वेळीच येथील आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. एपीएमसी पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.