नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
कोरल वाडी, आपटा येथील आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण स्थगित
उरण : सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामविकास संवर्धन सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली कोरल वाडी, आपटा येथील आदिवासी बांधवांनी २९ ऑवटोबर रोजी उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन आयोजित केले होते. या उपोषण आंदोलनाच्या अनुषंगाने पनवेल येथील पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता यांनी काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांनी पुकारलेले आंदोलन स्थगित केले.
उपोषणकर्ते आणि अधिकारी यांच्यात झालल्या बैठकीमध्ये आपटा ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन योजनेतील पाणी पुरवठा योजना अंतर्गत असलेल्या कोरल वाडी आणि इतर वाड्यांच्या पाईपलाईनचे काम पुढील ४ दिवसात पूर्ण करुन देण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पनवेल यांनी दिले. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वतः उप विभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण होणार असून कोरळ वाडीवरील सर्व कुटुंबांचे अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्ड देण्यात आले. तसेच राहिलेल्या कुटुंबांचे रेशन कार्ड थोड्या दिवसात देण्यात येणार आहे.
याशिवाय कोरळ वाडीला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहण्यासाठी उप-विभागीय अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीम सोबत पाहणी दौरा ठेवला असून त्याच दिवशी योग्य ते आदेश दिले, जातील असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी तुर्तास उपोषण स्थगित केले आहे.
यावेळी आयोजित बैठकीस उप अभियंता (पाणी पुरवठा विभाग), नायब तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड उपस्थित होते. ॲड. राजेंद्र मढवी यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते काशिनाथ जाधव, दिलीप मोरे, सुभाष मेहतर, सुभाष फडके, वाजिद शेख, रोहित ढमाल, गणेश थोरवे, लाडीवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, ग्रामस्थ बी. एस. कुलकर्णी, गुरुदास वाघे, संतोष पवार आणि कोरळवाडी, आपटा ग्रामस्थ देखील उपस्थित होते.