पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये थरार
नवी मुंबई : लाल रंगाच्या तवेरा मधून दरोडा टाकण्यासाठी ३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास वाशीमध्ये आलेल्या ६ जणांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी थरारक पाठलाग केल्याची घटना घडली. या थरारक पाठलाग दरम्यान दरोडेखोरांनी वाशीतील सागर विहार परिसरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला; मात्र ५ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. दरोडेखोरांची तवेरा पोलिसांच्या हाती लागली असून त्यात दरोड्यासाठी लागणारी हत्यारे आणि साहित्य सापडले आहेत. पोलिसांनी तवेरा जप्त करुन पळून गेलेल्या ५ दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे.
वाशी परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे युनिट-२ चे पथक ३ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लाल रंगाच्या तवेराचा माग काढत वाशीमध्ये आले होते. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाला दरोडेखोरांची संशयित तवेरा निदर्शनास आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आणि वाशी पोलिसांनी या दरोडेखोरांचा पाठलाग सुरु केला. यावेळी सर्व दरोडेखोर वाशीतील सागर विहार परिसरात गेल्यानंतर त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, यावेळी दरोडेखोरांनी पोलीस पथकाच्या अंगावर तवेरा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस थोडक्यात बचावले.
यावेळी दरोडेखोरांच्या तवेराची इतर २ वाहनांना धडक लागल्यानंतर दरोडेखोरांनी तवेरा त्याच ठिकाणी सोडून सागर विहार लगतच्या खाडीकिनारी पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, या टोळीचा प्रमुख परमजित पोमण सिंग, उर्फ नागेश, नागराज (४३) पोलिसांच्या हाती लागला. मात्र, सरदार, नेपाली थापा, हसन, नेपाली आणि हसनचा मित्र असेे ५ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी या दरोडेखोरांच्या तवेराची तपासणी केली असता त्यात १ हायड्रोलिक कटर, ५ स्क्रु ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, लोखंडी रॉड, दोरी बंडल, ४ गोणी आणि ५ मोठ्या पिशव्या, हॅन्डग्लोवज जोड, ५ कैचीचे पाते, ३ मिरची पुड पाकिटे, आदि दरोडा टाकण्यासाठी लागणारे हत्यार आणि साहित्य आढळून आले.
दरोडेखोरांची तवेरा आणि त्यातील दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारे, साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. तसेच पकडलेल्या दरोडेखोरासह पळून गेलेल्या त्याच्या साथिदारांविरोधात दरोड्याचा प्रयत्न, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही धुमाळ यांनी सांगितले.