भिवंडीकरांना जलकर, मललाभ करवाढ

भिवंडी : भिवंडी महापालिकेने नुकतेच जललाभ कर आणि मललाभ कर या दोन करांमध्ये लक्षणीय वाढ केल्याने शहरातील करदाते नागरिक संतप्त झाले आहेत. नियोजनात्मक नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने नियमित आणि वेळेत जल आणि मल सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणच्या नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा कायदेशीर दाबाने होत नाही. तळमजल्यावर देखील महापालिकेचे पाणी मिळविण्यासाठी विजेची मशीन लावावी लागते. महापालिका क्षेत्रात अनेक जुने-नवे गृहसंकुले असून त्यामध्ये गृहनिर्माण सोसायट्या स्थापन झाल्या आहेत. अशा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदनिकाधारकाकडून मालमत्ता करासोबत जलकर घेतला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून वेगळा जलकर आकारताना सोसायटीच्या जलवाहिनीच्या जलकर रद्द केलेला नाही. तसेच अनेक ठिकाणी नियमित आणि सरकारी वेळेनुसार पिण्याचे शुध्द पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे ड्रेनेज बाबत वारंवार तक्रार करुन देखील ड्रेनेज प्रवाह आणि चेम्बरची दुरुस्ती केली जात नाही.

केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमधून शहरातील नागरिकांसाठी योजनानुसार काम झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. मात्र, जल आणि मल वाहून नेण्याचे काम सुरु झालेले नाही. शहरातील नागरिकांना योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या टाक्यांमधून नागरिकांना पाणी वितरित केलेले नाही. तसेच मलनिःस्सारणासाठी भुयारी गटारांची योजना राबविली; पण ती अद्याप सुरु झालेली नाही. तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भिवंडी महापालिका सुविधांची नागरिकांना केवळ स्वप्ने दाखविली. मात्र, प्रत्यक्षात अनेक समस्यांचा सामना करदात्या नागरिकांना करावा लागत आहे.

भिवंडी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य यांनी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या ठराव क्र. ७४३ नुसार पाणीपुरवठा विभागाच्या सूचनेने सध्याच्या प्रशासनाने अलीकडेन जल लाभ कर आणि मल लाभ कर २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून लागू केला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून करयोग्य मूल्याच्या निवासी वापराकरिता १० टक्के आणि अनिवासी वापराकरिता १५ टक्के जल लाभ कर आकारण्यात आला आहे. तर सर्वप्रकारच्या मालमत्ताना सरसकट ८ टक्के मालमत्ता कर आकारण्यात येणार आहे. याबाबत शहरातील करदात्या मालमत्ताधारकांना सदर दरवाढ माहिती होण्याच्या हेतूने महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत दवंडी देखील दिली नाही अथवा हरकती देखील मागविल्या नाही.

सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अशी अचानक मनमानीपणे दरवाढ केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक पाहता महापालिकेला अनेक मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नाही. त्यामुळे वाढलेल्या कराचा भुर्दंड नियमित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सहन करावा लागणार आहे.

भिवंडीत जल आणि मल प्रवाहासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्या कार्यान्वित होणार आहेत. त्या योजनेनुसार चालणाऱ्या कामकाजासाठी नियमित येणारा खर्च आणि या योजना अद्यावत ठेवण्यासाठी लागणारा खर्च मोठा असून त्यासाठी दरवाढ करणे अपेक्षित आहे.
-संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता-भिवंडी महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपत्ती व्यवस्थापन संदर्भात समन्वयाने काम पहावे