दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
नवी मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फटाके, दिवे आणि सजावट. दिवाळी सणाचा आनंद लुटताना फटाक्यांमुळे होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सण साजरा करावा, असा सल्ला तज्ञांकडुन देण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे भाजण्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांमुळे होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे आणि काय करु नये (डुस ऍन्ड डोन्स्टस) याबाबत ऐरोलीतील नॅशनल बर्न्स सेंटर आणि बर्न्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
फटाक्यांमुळे होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि इमारतींपासून दूर उडवावेत. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि त्यांना फटाके हाताळू देऊ नयेत. लहान मुलांच्या हातात कधीही फुलबाज्या देऊ नयेत, सूती आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे परिधान करावेत, तसेच जवळच थंड पाण्याची बादली ठेवावी, अशा सुचना तज्ञांकडुन करण्यात आल्या आहेत. फटाके हातात धरुन पेटवू नयेत, फटाके जमिनीवर ठेवूनच बाजूने पेटवावेत, तसेच न पेटलेल्या फटक्याजवळ त्वरित जाऊ नये, कारण ते उशिरा फुटून अपघात घडू शकते. घराच्या आत किंवा बंद जागेत कधीही फटाके, मेणबत्त्या वा तेलाचे दिवे पेटवू नयेत, असा इशाराही तज्ञांकडुन देण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये निष्काळजीपणा आणि अज्ञानामुळे भाजण्यांच्या घटना घडत असतात. थोडीशी काळजी घेतल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. सूती कपडे परिधान करणे, फटाक्यांपासून अंतर राखणे आणि पाणी किंवा फर्स्ट एड किट जवळ ठेवणे या छोटÎा गोष्टींनी मोठा फरक पडतो. दिवाळीत 10 पैकी 8 भाजल्याच्या घटना या पाऊस फटाक्यामुळे (फाउंटन फटाका) होत असल्याचे आढळुन आले आहे. पाऊस फटाका पेटवताना, लहान फुलबाजी वापरल्यास हात जवळ राहतो आणि स्फोटाचा धोका वाढतो. त्यामुळे पाऊस (फाउंटन फटाका) पेटवताना 12 इंची फुलबाजी वापरावी, अशा सुचना तज्ञांकडुन करण्यात आल्या आहेत.
दिवाळीत प्रामुख्याने वडील आणि मुलेच फटाके पेटवत असल्याने त्यांच्यात भाजण्याचे प्रमाण जास्त आढळते. तर महिलांमध्ये दिव्यांमुळे आग लागून भाजण्याचे प्रकार वाढतात. विशेषत: साडी अथवा सणाच्या पोशाखामुळे कपडे पेटण्याचा धोका असतो. तसेच वृद्ध नागरिकांनी पूजेदरम्यान अधिक काळजी घ्यावी, कारण आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तितक्या जलद प्रतिसाद देता येत नाही.
भाजल्यास काय करावे?
फटाक्यांमुळे भाजल्यास जोपर्यंत जळजळ कमी होत नाही तोपर्यंत त्या भागावर थंड पाणी सतत ओतावे किंवा थंड पाण्यात बुडवून ठेवावे. भाजलेल्या जागेवर हळद, टूथपेस्ट, बर्फ किंवा शेण लावू नये. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
डॉ. सुनील केसवानी (नॅशनल बर्न्स सेंटर आणि बर्न्स असोसिएशन ऑफ इंडिया)
सावधानता म्हणजे सुरक्षितता आहे, त्यामुळे सण साजरा करा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या! दिवाळीचा आनंद राखा, पण काळजी विसरु नका. सुरक्षिततेची ज्योत पेटवा आणि अपघातमुक्त सण साजरा करा. आमचा उद्देश सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरा करण्याचा आहे. या कालावधीत भाजण्याचे प्रकार घडल्यास नागरिकांनी त्वरित नॅशनल बर्न्स सेंटरच्या 24 तास कार्यरत हेल्पलाइन क्रमांक 022-27793333 वर संपर्क साधावा.