नाल्याच्या प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका ड-प्रभाग क्षेत्रातील वि्ीलवाडी नजिकच्या खडेगोळवली मुख्य नाल्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या प्रवाहातून सुखरुप बाहेर काढल्याची घटना ३ जुलै रोजी घडली.
प्रवीण पवार नावाची व्यक्ती मद्यप्राशन केलेल्या अवस्थे महालक्ष्मी शॉपिंग सेंटरजवळील मोठ्या नाल्याजवळ बाटल्या वेचण्यासाठी गेली होती. यावेळी तोल जाऊन तो नाल्यात पडला. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तत्काळ कारवाई करीत वेगाने वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहातून मोठ्या दमछाकीअंती अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रवीण पवार याला सुरक्षितपणे बाहेर काढले.
सुदैवाने यात प्रवीण पवार याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून तो सध्या स्थिर आणि सुरक्षित असल्याचे महापालिका ड-प्रभाग सहाय्यक आयुक्त उमेश यमगार यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी अशा ठिकाणी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.