महिला बचत गटामार्फत कर पावत्या वितरण
वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचे कर पावती वितरण यापुढे बचत गटातील महिला करणार आहेत. त्यासाठी महिला बचत गटांना एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात येत होते. १५ मे रोजी तुर्भे विभागात अखेरचे प्रशिक्षण पार पडले असून अंतिम प्रशिक्षण वाशी विभागात देण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरात लाखो नोंदीत मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे वर्षातून दोनदा सहामाही मालमत्ता कर मालमत्तांना आकारले जाते. त्याच्या कर पावत्या महापालिका कर्मचारी वितरण करीत असतात. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असे. त्यामुळे कर पावती वाटप प्रणाली अधिक सुलभ व्हावी आणि या माध्यमातून महिलांना देखील अल्प रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून सदर कर पावत्या बचत गटातील महिलांच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
सदर पावत्या वाटपाआधी महिलांना त्याचे योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून महापालिकेने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिलांनी फोन मधील प्रॉपर्टी टॅक्स (मालमत्ता कर बिल) वाटपाचे काम करण्याचे ॲप्स (प्रणाली) कसे हाताळायचे? याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरिता सदर ॲप्स हाताळण्याचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण महापालिकातर्फे आणि या संस्थेच्या माध्यमातून २१ एप्रिल पासून महापालिका मुख्यालयात देण्यास सुरुवात केली होती. याचे अखेरचे प्रशिक्षण १५ मे रोजी तुर्भे विभागात पार पडले असून अंतिम प्रशिक्षण आता वाशी विभागात पार पडणार आहे. त्यानंतर महिला मालमत्ता कर पावत्या घरोघरी वाटताना दिसतील.
नवी मुंबई महापालिका शहरातील महिलांना स्वयंरोजगारात सक्षम करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आली आहे. महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाती मालमत्ता कर वाटप दिल्याने अशा महिलांना अल्प रोजगार उपलब्ध करुन दिल्याने याचे स्वागत केले पाहिजे, असे मत आई माऊली बहुउद्देशीय सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा दर्शना भोईर यांनी सांगितले.