हजारो घरांतून जमा झालेल्या प्लास्टिकवर होणार पुनर्प्रक्रिया
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत ‘प्रत्येक घर – प्लास्टिकमुक्त’ या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राबविण्यात आला. या मोहिमेत शाळा, सोसायट्या, कार्यालये आणि विविध संस्थांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना लोकसहभागातून प्रत्यक्ष साकारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुषंगाने संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात दोन्ही परिमंडळांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेच्या प्लास्टिक संकलनासाठी बनवलेल्या विशेष वाहनाद्वारे 14 संकलन केंद्रावरून संकलित करण्यात आलेले 141 कि.ग्रॅ. प्लास्टिक एकत्रित करण्यात आले. हे प्लास्टिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी न जाता पुनर्प्रक्रियेद्वारे उपयुक्त वस्तूंमध्ये बदलले जाणार आहे. या वस्तू पुढील काळात सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
‘प्रत्येक घर – प्लास्टिकमुक्त’ या उपक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे या मोहिमेचे खास वैशिष्ट्य ठरले. ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांच्या मनावर प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संस्कार करणारा असल्याने शहराच्या पर्यावरणपूरक भविष्यासाठी हा उपक्रम महत्वाचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या सहयोगाने आता दर आठवड्याला नियमितपणे ‘प्लास्टिक आणि ई-कचरा संकलन मोहीम’ राबविण्यात येणार आहे. ‘शून्य प्लास्टिक व ई-कचरा क्षेपणभूमी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा उपक्रम स्वातंत्र्यदिनापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला आहे.
गृहनिर्माण संस्था, सोसायट्या, शाळा, कार्यालये आणि इतर संस्थांनी या मोहीमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी प्रोजेक्ट मुंबई संस्थेशी किंवा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनीही आपल्या घरातील स्वच्छ आणि कोरडे प्लास्टिक दर गुरुवार व शुक्रवार आपल्या नजिकच्या महानगरपालिका विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वच्छता अधिकारी अथवा स्वच्छता निरीक्षक यांचेकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.