शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ द्या - संतोष ठाकूर

उरण : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले होते.त्याची भरपाई आजतागायत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. उरण तालुक्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच २६ मे २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या नैसर्गिक संकटात कळंबुसरे गावातील जवळपास १५० पेक्षा जास्त तसेच चिरनेर सह इतर गावांतील घरांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटातील शेतकऱ्याला, रहिवाशांना मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजुला ठेवून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ‘शिवसेना'चे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी सरकारकडे केली आहे.

‘शिवसेना'चे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, उरण तालुक्यातील भातशेतीचे अतिवृष्टीमुळे मागील वर्षी नुकसान झाले होते. तसेच फळ बागायतीचे देखील नुकसान झाले होते. त्या आपदग्रस्तांना आजतागायत नुकसान भरपाई देण्यासाठी

सरकारने पुढाकार घेतला नाही. त्यात यावर्षी २६ मे रोजी उरण पूर्व विभागातील गावात वादळी पाऊसाने हैदोस घातला. यात एकट्या कळंबुसरे गावातील १५० पेक्षा जास्त तसेच चिरनेर सह इतर गावांतील रहिवाशांच्या घरावरील कौले, पत्र्याचे छप्पर उडून संसार मातीमोल झाला होता.

यावेळी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, महेंद्र घरत यांनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजप मित्र पक्षाच्या सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. सदरची शोकांतिका असून संकटातील शेतकऱ्याला, रहिवाशांना मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजुला ठेवून सर्वप्रथम नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वारंवार सरकार दरबारी ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे केली आहे. परंतु, सरकार दरबारी नुकसानग्रस्तांना न्याय मिळत नसेल तर सरकार गोरगरीबांचे सरकार आहे की भांडवलदारांचे? असा सवाल देखील संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे, रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्या पंचनामांचा अहवाल तलाठी, ग्रामसेवक आणि कृषि विभागाकडून प्राप्त झाला असून तो सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे सरकार कडून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येईल.
- डॉ. उध्दव कदम, तहसीलदार-उरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टिटवाळा गणेश मंदिर रस्त्यावर भूमीगत मलवाहिन्याचे पाणी रस्त्यावर