मिरा रोड मध्ये मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा
भाईंदर: मिरा-रोड मध्ये ८ जुलै रोजी सकाळी मोर्चा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी एकीकरण समिती यांनी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली होती. पोलिसांनी नोटीस बजावून तसेच काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. तरीसुध्दा मराठी भाषिकांनी ठरलेल्या ठिकाणाहून भव्य मोर्चा काढला. ‘जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी मिरा रोड परिसर दणाणून सोडले.
मिरा-रोडच्या शांती पार्क भागातील व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे मिरा-भाईंदर मधील व्यापारी संघटनांनी ‘मोर्चा'चे आयोजन केले होते. त्यामुळे मराठी भाषिकांची गळपेच थांबवण्यासाठी मनसे आणि मराठी एकीकरण समिती यांनी सुध्दा मराठी भाषिकांच्या ‘मोर्चा'चे आव्हान दिले होते. परंतु, पोलिसांनी ‘मोर्चा'ला परवानगी नाकारली होती.
दरम्यान, ‘मोर्चा'ला परवानगी नाकारल्यानंतर ८ जुलै रोजी पहाटेपासून पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती. मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखीनच तापले. तर सकाळी संदीप राणे, प्रदीप जंगम, सचिन घरत, गोवर्धन देशमुख,पवन घरत, अनिल रानवडे यांना सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेऊन मोर्चा थोपविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवून मोर्चा निघण्याच्या ठिकाणाला पोलीस छावणीचे स्वरुप आणले होते. परंतु, त्याला न जुमानता मराठी भाषिकांनी भव्य मोर्चा काढला. ‘मनसे'च्या ‘मोर्चा'ला इतर पक्षांचाही पाठिंबा मिळाल्यानंतर आणि मराठीच्या मुद्द्यावर नागरिक मिरा-भाईंदरमध्ये जमू लागल्यावर सरकारने देखील नरमाईची भूमिका घेतली आणि ‘मोर्चा'ला परवानगी द्यावी लागली. तसेच अविनाश जाधव यांचीही सुटका करण्यात आली आहे. शांती पार्क, शांतीनगर त्यानंतर मिरा रोड रेल्वे स्टेशन पर्यंत सदर मोर्चा नेण्यात आला. या ‘मोर्चा'मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून दिली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ना. सरनाईक यांचा ‘मोर्चा'तून काढता पाय...
‘मोर्चा'मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘मोर्चा'चे आयोजक तथा ‘मराठी एकीकरण समिती'चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या समवेत सहभाग घेतला होता. परंतु, ना. प्रताप सरनाईक यांना पाहताच आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘प्रताप सरनाईक गो बॅक, ५० खोके एकदम ओके, जय गुजरात'च्या घोषणा दिल्या. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या दिशेने बॉटल्सही फेकल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांचा सदर आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना ‘मोर्चा'मधून बाहेर काढले. सरनाईक भाषणही करणार होते. मात्र, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी काढता पाय घेतला.