गव्हाणगांव पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा
उलवे : गव्हाण गावाला नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत १५ ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून, सिडको प्रशासनाने १५ ऑगस्ट पासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मोर्चादरम्यान गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भात येत्या ५ ते ६ दिवसांत ‘सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आणि उलवे नोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाण गांव त्याचा एक भाग असूनही विविध मुलभूत समस्यांना सामोरे जात आहे. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. गावाला दररोज सुमारे ६ लाख लिटर पाण्याची गरज असताना, पाणी कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात सोडले जात होते.
मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली. यावेळी ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाला भाजप नेते तथा पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाज नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजू कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
मोर्चा मार्गस्थ होण्याआधी ‘सिडको'चे सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सखोल चर्चेनंतर, सिडको प्रशासनाने गव्हाण गावाला आवश्यक पाणीपुरवठा तात्काळ सुरु करण्याचे मान्य केले. तसेच कायमस्वरूपी तोडगा म्हणून हेटवणे पाणी पुरवठ्यातून स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याच्या मागणीवर येत्या काही दिवसात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले.
दरम्यान, ‘सिडको'कडून तातडीच्या पाणीपुरवठ्याच्या आश्वासनानंतर आणि पुढील चर्चेची खात्री मिळाल्यानंतर मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला.
गव्हाण गावासाठी हेटवणे पाणी पुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. या संदर्भात लवकरच ‘सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत गावाला मुबलक प्रमाणात, योग्य त्या दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे हमीपत्र आम्हाला सिडको प्रशासनाने दिले आहे.
-प्रितम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते-पनवेल महापालिका.