पामबीच मार्गावर मर्सिडीज कारचा भिषण अपघात

नवी मुंबई : सीवुडस्‌ येथून पामबीच मार्गे वाशीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मर्सिडीज कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाजवळ रस्ता दुभाजकाचे रेलिंग तोडून बेलापूर लेनवर उलटल्याची घटना २८ जुलै रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या भिषण अपघातात कार चालक आणि त्याचा मित्र असे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात मर्सिडीज कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मोहम्मद सलमान शेख (२०) आणि मोहम्मद सुफीयान शेख (१९) या दोघांचा समावेश आहे. दोघेही सीवुडस्‌ येथे राहण्यास असून ते सध्या शिक्षण घेत आहेत. २८ जुलै रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास सदर दोघे मित्र मर्सिडीज कारने पामबीच मार्गावर फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. यावेळी सीवुडस्‌ येथून भरधाव वेगाने वाशीच्या दिशेने जात असताना, पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाजवळ चालक मोहम्मद सलमान शेख याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची मर्सिडीज कार रस्ता दुभाजकावर असलेले रेलिंग तोडून पलटी मारत बेलापूर लेनवर गेली. या अपघातात कार चालकासह त्याचा मित्र दोघे गंभीर जखमी झाले. यात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलीस आणि सीवुडस्‌ वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघातातील दोन्ही जखमीना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच अपघातग्रस्त मर्सिडीज कार बाजुला काढली. या अपघातात कार चालक मोहम्मद सलमान शेख किरकोळ जखमी झाला असून त्याचा मित्र मोहम्मद सुफीयान शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार यांनी दिली. तसेच या अपघातातील कारचालक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पामबीच मार्गावर ८० कि.मी. वेगापर्यंत वाहने चालविण्यास परवानगी असताना, देखील अनेक वाहन चालक १०० ते १५० कि.मी. वेगाने आपली वाहने घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे. या अति वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पामबीच मार्गावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तसेच यात अनेक जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमचे जयबंदी झाले आहेत. ओव्हरस्पीड वाहनांमुळे पामबीच मार्गावर होणारे अपघात, त्यामुळे होणारी जीवितहानी आणि नुकसान टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पामबीच मार्गावर ओव्हरस्पीड वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतर देखील अनेक वाहन चालक सुसाट वाहन चालवत असल्याने या मार्गावर अपघात होत असल्याचे आढळून आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रिक्षावर धोकादायक स्टंट करणाऱया तीन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात