तीन महिन्यात १७८७ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त   

सिडकोची २००० कोटींची जमीन अतिक्रमणमुक्त  

नवी मुंबई  : सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे करुन सिडकोची जागा हडप करणाऱया भूमाफिया व बांधकाम धारकांविरोधात गत वर्षभरापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी २१०० अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चढवणाऱया सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीतच तब्बल १७८७ अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढवून ते जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे सिडकोची सुमारे २००० कोटीहून अधिक बाजारमुल्य असलेली तब्बल १९५४१६ चौ. मी. (४९ एकर) क्षेत्रफळ जागा अतिक्रमणमुक्त झाली आहे.  

नवी मुंबई, पनवेल, उलवे व द्रोणागिरी परिसरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रण करुन त्यावर विना परवानगी इमारती उभारुन भूमाफियांनी सिडकोची शेकडो एकर जागा गिळंकृत केलेली आहे. आपल्या जागा बळकावल्या जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया सिडको व्यवस्थापनाला अखेर जाग आल्यानंतर त्यांनी अतिक्रमणविरोधी मोहिम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने दररोज अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे.  

गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करून २०६४३१ चौ.मीटर (५२ एकर) इतके क्षेत्रफळ अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळविले होते. या अतिक्रमणमुक्त जमिनीचे बाजारमूल्य २५०० कोटीहून अधिक आहे. गत वर्षी अतिक्रमण तोडण्यासाठी सुरु केलेल्या धडक मोहिमेची व्याप्ती वाढवत सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी गेल्या वर्षी एकूण तोडलेली अनधिकृत बांधकामांची संख्या होती तितकी बांधकामे यावर्षी तीन-साडेतीन महिन्यातच तोडून नवा रेकॉर्ड प्रस्तापित केला आहे.  

यावर्षी अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नवी मुंबई व पनवेल महापालिकेसह उर्वरित सिडकोच्या दक्षिण क्षेत्रातील सिडकोच्या भूखंडांवर अनधिकृत बांधकाम करणाऱयाना २९६ नोटीसा बजावल्या होत्या. तर अतिक्रमण निष्कासनासाठी नियोजित केलेल्या २१८ मोहिमांपैकी अवघ्या १३० मोहिमांमध्ये अनधिकृत बांधकाम तोडण्यात सिडकोला यश आले आहे. या १३० मोहिमांमध्ये कच्ची बांधकामे, आरसीसी बांधकामे, टपऱयांसह एकुण १७८७ बांधकामे जमीनदोस्त करून सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने तब्बल १९५४१६ चौ. मी. जमिनीचे क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे. सदर अतिक्रमणमुक्त जमिनीचे बाजारमुल्य २००० कोटींहून अधिक आहे.  

अतिक्रमणमुक्त काही भूखंडाचा निधी उभारण्यासाठी लिलाव  

सिडकोच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले जात असल्याने अनधिकृत बांधकाम विरोधात सिडकोची मोहिम अधिक तीव्र केली जात आहे. भविष्यात विमानतळासह एज्युसिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्क यासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प नवी मुंबईत कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे सिडकोला जमीन व निधीची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त काही भूखंडांची मार्केटिंग विभागाद्वारे विक्री करुन सिडको सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे.

सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी सिडको)
नवी मुंबई एक सुनियोजित शहर असून या शहराची अनिर्बंध वाढ रोखणे हे सिडकोचे प्रमुख कर्तव्य आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सिडकोने नेहमीच कठोर पाऊले उचलली आहेत. त्याअंतर्गतच सध्या सिडकोतर्फे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरू आहे. भविष्यात अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असून शहरातील अनधिकृत बांधकामांची यादी सिडकोने तयार केली आहे. यात ज्यांनी मोठमोठाले भूखंड हडप केले आहेत, ते सर्वप्रथम सिडकोच्या रडारवर आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेत सीपीआर कार्यशाळेचे आयोजन