आ. मंदाताई म्हात्रे यांची वाशी सागर विहार परिसरात पाहणी
नवी मुंबई : स्थानिक प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आणि नेहमी विकास कामांसाठी कार्यरत असलेल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड'चे अधिकारी देवरे आणि नवी मुंबई महापालिका वाशी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत वाशी येथील सागर विहार परिसराचा पाहणी दौरा केला. या पाहणीत आ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वप्रथम परिसरात केली जाणारी दैनंदिन साफसफाई, मँग्रोज सफाई-संवर्धन, जेट्टी नुतनीकरणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच सदर परिसरात जनहितार्थ कोणकोणत्या नागरी सुविधा उपलब्ध करता येतील, याकडेही जातीने लक्ष घातले. याशिवाय सकाळी मोर्निग वॉकिंगला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी आवश्यक सेवा-सुविधा, आसन व्यवस्था, गजेबो गार्डन, कँटीन, हायमास्ट अशा अनेक विषयांवर वाशी विभागाच्या कार्यकारी अभियंता शुभांगी दोंडे यांच्याशी चर्चा केली.
वाशी, सेवटर-१० मधील जुहू चौपाटी परिसरामध्ये नियमित परिसर स्वच्छता, डास प्रतिबंधासाठी नियमित धुरीकरण, जॉगिंग ट्रॅकच्या पेव्हर ब्लॉकची दुरवस्था, होल्डींग पाँईंट स्वच्छता आणि र्निजंतुकीकरण याबाबत देखील आ. मंदाताई म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच इतर सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. वाशी सागर विहार आणि मिनी सिशोर येथे ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड'च्या माध्यमातून आगरी-कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणात नागरी सुखसोई सुविधा उपलब्ध करण्याकरिता चर्चा केली.
वाशी, सेवटर-८ येथे सिडको निर्मित वाशी जेट्टीवर पूर्वी हॉवरक्रापट सेवा सुरु होती. ती कालांतराने बंद झाली. सदर जेट्टी आधुनिक प्रकारची बनवून पुन्हा हॉवरक्रापट सुरु करून याठिकाणी एक पर्यटनस्थळ निर्माण करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये पावसाळ्यात नवी मुंबईतील केमिकल कंपनीद्वारे सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरण पावतात. त्यामुळे स्थानिक कोळी बांधवांवर उपसमारीची वेळ येत असते. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मार्फत शासनाचे लक्ष वेधून केमिकल सोडणाऱ्या संबंधित कंपन्यांवर कारवाई होण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
सदर पाहणीप्रसंगी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ‘भाजपा'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी नगरसेवक राजू शिंदे, भाजपा वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, पाशाभाई, मंगेश चव्हाण, प्रताप भोसकर, प्रविण भगत, रामकृष्णन अय्यर, जयंत पाटील, राखी पाटील, मालती सोनी, सुमा रंजिथ, अमोल जुनेजा तसेच वाशी विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.