‘केडीएमसी'च्या १४ शाळांमधील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण
कल्याण : छोटे-छोटे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पही मोठ-मोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. लोकसहभागातून ‘केडीएमसी'च्या १४ शाळांवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे २७ मे रोजी एकाचवेळी आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी आयुवतांनी संवाद साधला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढत चालले आहेत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु, देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही, तोपर्यंत लक्ष्य गाठता येणार नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात आलेले सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती, संस्था, बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आभार मानले. तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले.
‘केडीएमसी'च्या विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण-डोंबिवली मधील १४ शाळांमध्ये ५० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यासाठी २५ लाखांहून अधिक खर्च आला आहे. सदर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी रिजेन्सी ग्रुप, वैष्णवी बिल्डकोन, कल्याण रनर्स ग्रुप, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, मोहन खेडा ग्रुप, स्वामी नारायण लाइफ स्पेसेस, थारवानी इन्फ्रा, बिर्ला वन्य, वेस्ट पायोनियर यांच्यासह मे. एस.एस इलेक्ट्रिल वर्कस्, जे. डी इलेक्ट्रिल वर्कस्, मे. एस. एस. इलेक्ट्रिक कंपनी, एमजी इलेक्ट्रिक अँड कंपनी, टॉप इलेक्ट्रिकल, आशिर्वाद इलेक्ट्रिकल, त्रिमूर्ती एंटरप्रायजेस, रॉयल इलेक्ट्रिकल, किरण इलेक्ट्रिकल, इंटरफेस डिजिटल, एअरटेक सोल्युशन, नेहल प्रॉपर्टी, मल्हार इलेक्ट्रिक वर्कस्, तुषार इलेक्ट्रिकल, के. बी. इलेक्ट्रिकल अँड कंपनी आणि कल्याण इव्हेंटस् यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. तर ‘एमसीएचआय'चे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण महापालिकेच्या इतर १६ शाळांमध्ये सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची जबाबदारी घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वीज बचतीचा संदेश घेऊन विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचेही यावेळी आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त संजय जाधव, रमेश मिसाळ, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.