पनवेल महापालिका तर्फे मालमत्ता कर शास्ती माफीला मुदतवाढ
पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना' राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार या योजनेत शास्ती माफीसाठी दिलेली मुदत आता वाढविण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत शास्तीवर ९०टक्के सूट राहणार आहे.
तसेच १६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत कर भरल्यास ७५ टक्के शास्ती माफी मिळणार आहे. तसेच २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपूर्ण कर भरल्यास ५ टक्के सवलतही दिली जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने करदात्यांना ई-बिल स्वीकारणे, डिजिटल पध्दतीने कर भरणे यासाठी प्रोत्साहित केले जात असून, असे केल्यास अतिरिक्त २ टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो. तसेच ऊर्जा बचत, जल पुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये सहभाग घेणाऱ्या करदात्यांना देखील २टक्के सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या panvelmc.org या अधिकृत संकेतस्थळावर तसेच PMC Tax App आणि Panvel Connect App द्वारे ऑनलाइन कर भरता येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित कर तत्काळ भरावा, असे आवाहन आयुक्त उपायुक्त स्वरुप खारगे यांनी केले आहे.
नागरिकांचा अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आता १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत शास्तीवर ९० टक्के सूट राहणार आहे. ‘अभय योजना'मध्ये १८ जुलै ते १५ ऑगस्ट आतापर्यंत एकूण २१२ कोटी ५७ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे.
‘कर-मित्र चॅटबॉट'चे लोकार्पण...
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महापालिकेने ‘कर-मित्र चॅटबॉट'चे नुकतेच लोकार्पण केले आहे. सदर अत्याधुनिक चॅटबॉट मालमत्ता करदात्यांना घरबसल्या त्वरित माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन मदत पुरवेल.