सीबीडी बेलापूर येथे ऑईल टँकर उलटला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

नवी मुंबई : तळोजा येथून शिवडी येथे जाणारा ऑईलने भरलेला टँकर सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथे उलटल्याची घटना.बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या टँकरमधील ऑईलची गळती झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या दुर्घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. सीबीडी येथील महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर मधील ऑईल दुसऱया टँकरमध्ये भरुन अपघातग्रस्त टँकर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आल्यानंतर सायंकाळी 5 च्या नंतर या मार्गावरील वाहतुक सुरुळीत सुरु करण्यात आली. 

या दुर्घटनेतील अपघातग्रस्त ऑईलने भरलेला टँकर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तळोजा येथून सायन-पनवेल मार्गावरुन शिवडी येथे जात होता. पहाटे अंधारामुळे व पावसामुळे टँकर चालकाला सीबीडी येथील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही. त्यामुळे सदरचा टँकर उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या रस्त्यावर गेला. यावेळी भरधाव वेगात असलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर टँकर भररस्त्यात पलटी झाला. यावेळी टँकर चालकाने बाहेर पळ काढला. सुदैवाने या टँकरमधील ऑईलची गळती झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सदर टँकर सीबीडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 

मात्र काही काळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर  वाहतुक कोंडी होऊन वाहने संथ गतीने जात होती.या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीबीडीच्या दिशेने जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर दुपारी ऑईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त टँकर मधील ऑईल दुसऱया टँकरमध्ये भरण्यास सुरुवात केली. सदरची प्रक्रीया सांयकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. त्यानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजुला काढण्यात आल्यानंतर सदर मार्गावरील  वाहतुक सुरु करण्यात आली. या अपघाताची नोंद सीबीडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे..

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वादळी हवामानामुळे सागरी प्रवासी वाहतूक बंद- प्रवाशांचे हाल