शहरातील विविध ठिकाणांची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबई : मागील तीन दिवसांपासून सुरु असलेला पर्जन्यवृष्टीचा जोर १७ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून अधिक वाढला असून नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा दक्षतेने कार्यरत असल्याने नवी मुंबईत कोठेही अडचणीचा प्रसंग उद्‌भवलेला नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईत विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीची पाहणी करीत आवश्यक सूचना दिल्या.

१७ ऑगस्ट रोजी ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नवी मुंबई क्षेत्रात ११५.१७  मि.मी. पावसाची नोंद झालेली असून १८ ऑगस्ट रोजी सायं. ५.३० पर्यंत सरासरी ८३.६८ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.
त्यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी १३४.६८ मि.मी. आणि १६ ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १०५.७० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि भरती एकाच वेळी असल्यास शहरातील काही अतिसखल भागात काही प्रमाणात पाणी साचते. मात्र, ओहोटी सुरु झाल्यानंतर या पाण्याचा निचरा होतो. त्या अनुषंगाने आयुक्तांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासमवेत प्राधान्याने समुद्राकाठी असणाऱ्या वाशीगांव आणि परिसराची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरातील इतर भागांनाही भेटी देत  तेथील स्थितीचीही पाहणी केली.

दुसरीकडे  सेक्टर-२१, एपीएमसी मार्केट रस्ता तसेच सानपाडा-जुईनगर येथील अंडरपास, सेक्टर-५ आणि सेवटर-७ ऐरोली येथील अष्टदर्शन सोसायटी समोरील रस्ता अशा ठिकाणी काही काळ पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एमआयडीसी क्षेत्रातही रबाले भागात पाणी उपसा पंपाद्वारे रस्त्यावर साचलेले पाणी काढून टाकण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने वाहतूक सकाळी आणि दुपारी वाहतुक मंद गतीने सुरु होती.

मागील ३ दिवस प्रत्येक दिवशी दररोज सरासरी १०० ते १२५ मि.मी. पर्जन्यवृष्टी होऊनही इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहरातील जनजीवन सुस्थितीत आहे. महापालिका मदतकार्यासाठी सज्ज आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता व घाबरुन न जाता कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास मदत कार्यासाठी महापालिकेच्या नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी २७५६७०६० / २७५६७०६१ या क्रमांकावर अथवा १८००२२२३०९ /२३१० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण, डोंबिवलीत पावसाचे धुमशान