नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
हापूस आंबा पेटीला २५ हजार रुपये भाव
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात यंदा दिवाळी सणाच्या दिवशी देवगड मधील हापूस आंबा दाखल झाला होता. सदर आंबा पिकल्यानंतर या ६ डझनच्या हापूस आंबा पेटीला विक्रमी २५ हजार रुपये दर भेटला आहे. त्यामुळे वाशीतील बाजारात आजवरचा हापूस आंबा पेटीला भेटलेला सर्वाधिक उच्चांकी दर ठरला आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील हापूस आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये मुहूर्ताचा हापूस आंबा दाखल होत असतो. यंदा मात्र ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी सणाच्या दिवशी देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी एपीएमसी फळ मार्केटमध्ये दाखल झाली होती.
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी यांच्याकडे प्रकाश शिर्सेकर यांची हापूस आंबा पेटी आल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या हापूस आंबा पेटीची पूजा करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हापूस आंबा पेटी एपीएमसी फळ बाजारात दाखल होण्याची यंदाची पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील व्यापारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे.याआधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात प्रकाश शिर्सेकर यांनी हापूस आंबा पेटी वाशी मधील एपीएमसी मार्केट मध्ये पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र, यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून दिवाळी सणाचा मुहूर्त साधला होता. मात्र, सदर आंबा कच्चा असल्याने त्याची पूजा करुन तो पिकण्यास ठेवण्यात आला होता. सदर आंबा पिकल्यानंतरच त्याची बोली लावली जाणार होती. त्यानुसार सदर आंब्याची बोली लागल्यानंतर या ६ डझन हापूस आंबा पेटीला विक्रमी दर भेटला आहे, अशी माहिती हापूस आंबा व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली.
एपीएमसी फळ बाजारात आजवर दाखल होणाऱ्या कोकणातील मुहूर्ताच्या हापूस आंबा पेटीला २० ते २२ हजार रुपये दर भेटला होता.यंदा मात्र देवगड मधील हापूस आंब्याला २५ हजार रुपये दर भेटल्याने एपीएमसी फळ बाजारात हापूस आंबा पेटी दराचा नवीन विक्रम झाला आहे.