दिव्यांग परिस्थितीत प्रियाची सीए परीक्षेवर मात,आई-वडिलांच्या कष्टातून मिळवले यश
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सावद या ग्रामीण भागातील प्रियंका जिजाबाई सुरेश जाधव हिने सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांची लाडकी लेक असलेल्या प्रियांकाने आपल्या मेहनतीने व चिकाटीने हे यश मिळवले आहे. दिव्यांग असलेली प्रियंका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावी आणि पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवत तिने बालपणापासून उराशी बाळगलेले ‘सी.ए. बनण्याचे’ स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. तिचे वडील सुरेश जाधव हे गोडाऊनमध्ये साफसफाईचे काम करतात. आई शेतात भाजीपाला पिकवून व विक्री करून कुटुंबाचा सांभाळ करते. अशा कठीण परिस्थितीतही मुलीने सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केल्याने संपूर्ण कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सी. ए. झाल्याबद्दल प्रियंका जाधव हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.