बेकायदेशीरपणे शाळांचा वीज, पाणी पुरवठा लवकर खंडीत महापालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात परवानगीशिवाय चालणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. महापालिका प्रशासनाने घोषित केलेल्या १८ बेकायदेशीर शाळांव्यतिरिक्त आणखी ५ अनधिकृत शाळांची यादी देऊन परवानगीशिवाय चालणाऱ्या सर्व शाळांवर कारवाई करण्याची मागणी ‘पीपल्स रिपब्लिकन पक्ष'ने केली आहे. तसेच १५ दिवसांत बेकायदेशीर शाळांवर कारवाई न केल्यास, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करु, असा इशाराही महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

दरम्यान, ‘पीपल्स रिपब्लिकन पक्ष'च्या इशाऱ्याची दाखल घेत महापालिका प्रशासनाने अवैध शाळांचे पाणी आणि वीज खंडीत करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत.

शिक्षण विभाग, महाराष्ट्र आणि भिवंडी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन शहरात चालणाऱ्या अनधिकृत शाळा आणि महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी मायनॉरिटी विभाग'चे भिवंडी शहर अध्यक्ष अब्दुल गनी खान यांनी निवेदनातून केली आहे. महापालिका प्रशासनाने शहरात सुरु असलेल्या १८ बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर केली होती. तरी देखील शहरात बेकायदेशीर शाळा सुरू आहेत. या शाळांमुळे सरकारी शाळा बंद होत आहेत. या अनधिकृत शाळांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि या शाळा चालवणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी अब्दुल खान यांनी सदर निवेदनातून केली आहे. तसेच सदर अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होत असल्याचा आरोप देखील खान यांनी केला आहे.

सदर शाळांवर कारवाई न झाल्याने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. राजकीय दबाव किंवा हितसंबंधामुळे शिक्षण विभागाने शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अर्धा डझनहून अधिक बेकायदेशीर शाळांची नावे यादीत समाविष्ट केलेली नाहीत. त्यामुळे या निवेदनात महापालिकेच्या यादीत समाविष्ट नसलेल्या ५ बेकायदेशीर शाळांची यादी देखील जोडली आहे. ब्राईट ज्युनियर कॉलेज-कल्याण रोड, व्हिक्टोरियन इंग्लिश स्वुÀल-गणेश सोसायटी, न्यू एरा इंग्लिश स्कुलची सेकंड ब्रांच-भारत कंपाऊंड, एमएम पब्लिक स्कुल, विवेकानंद इंग्लिश स्कुल-टेमघर अशी आहेत. सदर ५  बेकायदेशीर शाळांची नावे महापालिकेच्या यादीत समाविष्ट न केल्याबद्दल अब्दुल खान यांनी महापालिका शिक्षण विभाग आणि शिक्षण विभाग, महाराष्ट्र यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यासोबत राज्य शिक्षण मंडळ आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाने बेकायदेशीर शाळांच्या घोषित यादीत या अनधिकृत शाळांची चौकशी करुन त्यांची नावे  समाविष्ट करावी. तसेच या अनधिकृत शाळा तात्काळ बंद कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे अशा अनधिकृत शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी करतानाच महापालिकेने तातडीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर ‘पीपल्स रिपब्लिकन पक्ष'मार्फत निदर्शने करण्यात येतील, असा इशारा खान यांनी दिला आहे.

महापालिकेने बेकायदेशीर घोषित केलेल्या शाळांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच दोन दिवसांत बेकायदेशीर शाळांबाहेर शाळा अनधिकृत असल्याचे बॅनर लावले जाईल. ज्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांना बेकायदेशीर शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, अशी विनंती केली जाईल. यासोबतच लवकरच बेकायदेशीर शाळांवर गुन्हा दाखल केला जाईल, ज्याची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे.

- बाळकृष्ण क्षीरसागर, उपायुक्त-शिक्षण विभाग, भिवंडी महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माणुसकी ओशाळली!