क्लस्टर विरोधात ‘भाजपा'चा महापालिकेवर मोर्चा

भाईंदर : नागरिकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने ‘क्लस्टर'मध्ये सामील न करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याच्या मागणीसाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा महापालिका मुख्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर आयुक्तांनी आमदारांसह शिष्टमंडळाची चर्चा केली. त्यात धोकादायक इमारतींच्या पुन्हा सर्वेक्षणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचे धोरण आखले आहे. तसेच त्यांचे वीज, पाणी पुरवठा खंडीत केला असून त्यांना इमारती रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यातील अनेक  इमारतींची दुरुस्ती शक्य आहे. त्यामुळे रहिवाशांची ती न पाडण्याची मागणी आहे. अशा अनेक तक्रारी आमदार मेहता यांच्याकडे आल्याने त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यावर निर्णय न झाल्याने अखेर ‘भाजपा'ने जिल्हा कार्यालयापासून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. त्यानंतर ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते डॉ सुरेश येवले, ओमप्रकाश गारोडीया, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, ध्रुवकिशोर पाटील, भगवती शर्मा यांच्यासह आ. नरेंद्र मेहता यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन धोकादायक इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करुन ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य आहे, त्यांना क्लस्टर आरक्षणातून वगळण्याबाबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, आयुक्त शर्मा यांनी धोकादायक इमारतींच्या पुन्हा सर्वेक्षणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे भाजपा प्रवक्ता रणवीर वाजपेयी यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

होल्डींग पाँडचे काम अपूर्ण; बेलापूर विभाग पाण्याखाली