आपत्ती व्यवस्थापनासाठी कोकण विभाग सज्ज
नवी मुंबई : आपत्ती सांगून येत नाही; परंतु आपत्तीमुळे होणारे नुकसान रोखणे आपल्याच हातात आहे.Zero Casualty म्हणजेच शून्य जीवितहानी हेच आपले प्रमुख ध्येय असावे, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले. पावसाळा पूर्वीच्या तयारीचा आढावा घेताना दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी संवाद साधला.
या बैठकीस जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कोकण रेल्वे, एसटी महामंडळ, नागरी संरक्षण, हवामान विभाग आणि औद्योगिक आरोग्य सुरक्षा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोकणात पावसाळ्यापूर्वी अचूक नियोजनाची आवश्यकता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोकण विभागात सरासरी ३१५८.१७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३९९४.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे संभाव्य नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण कोकण विभागात योग्य नियोजनाची गरज आहे, असे आयुवत डॉ. सुर्यवंशी म्हणाले.
जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून संबंधित ‘प्राधिकरण'कडून मंजुरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात सध्या २९८९ शोधआणि बचाव पथके कार्यरत असून त्यात एकूण २०,२७८ प्रशिक्षित सदस्य आहेत. या सदस्यांनी ‘आपदा मित्र' उपक्रमाअंतर्गत तालुका आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतले आहे. मे २०२५ अखेरपर्यंत मॉकड्रिल्स राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धरणातील पाणी विसर्गाचे नियोजन...
कोकण विभागात ९ मोठे, ९ मध्यम प्रकल्प आणि १४३ लघु प्रकल्प अशी धरणे आहेत. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणे भरल्यास, नियोजित पध्दतीने पाण्याचा विसर्ग करावा आणि नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. यासाठी स्थानिक प्रशासनाने (उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका) जलद प्रतिक्रिया देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करावा. विसर्गाच्या आधी संबंधित यंत्रणांना सूचना देणे आवश्यक आहे, विशेषतः जेथे पाण्याचा धोका संभवतो. धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन करावे. अशा ठिकाणी जवळपासच्या रिसॉर्ट, हॉटेल मध्ये साहसी खेळांवर बंदी आणावी अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे नियोजन करावे, असे आयुवत डॉ. विजय सुर्यवंशी यांनी निर्देश दिले.
अत्यावश्यक सेवा-सुविधा सज्ज ठेवाव्यात...
पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे, चक्रीवादळ, झाडे-इमारती कोसळणे, रस्ते बंद होणे या घटना घडतात. अशावेळी जेसीबी, डंपर, वुड कटर, ट्रक अशी यंत्रसामग्री तत्काळ उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. बाधित नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी शाळा, मंदिर, हॉल, आदि ठिकाणे निवासासाठी सज्ज ठेवावी. पाणी, अन्न, वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात. धरणातील पाण्याचा विसर्ग नियोजित पध्दतीने करावा. स्थानीय प्रशासनाने विसर्गापूर्वी नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. ‘एनडीआरएफ'च्या तुकडयांना तैनात ठेवावे. त्यांचे संपर्क क्रमांक अद्यावत ठेवावे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीस अडथळा झाल्यास पर्यायी वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाशी समन्वय साधावा, असे कोकण आयुवतांनी सूचित केले.
आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर...
पावसाळ्यात साथीचे रोग वाढू शकतात. यासाठी औषधांचा साठा, पाण्याचे शुध्दीकरण, साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरी संस्थांनी नियमितपणे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून नागरिकांना शुध्द पाणी उपलब्ध करुन द्यावे, असेही डॉ. सुर्यवंशी म्हणाले.
आपत्ती नियंत्रणासाठी २४x७ नियंत्रण कक्ष...
सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये आणि महापालिका स्तरावर २४x७ आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षात संगणक, इंटरनेट, ई-मेल, दूरध्वनी, हॉटलाईन सेवा उपलब्ध असावी. आपत्तीशी संबंधित कोणतीही माहिती तत्काळ शासनाला कळवावी. नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तत्काळ प्रतिसाद द्यावा. अशा सूचना आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या. तसेच Zero Casualty असे फक्त घोषवाक्य नाही, तर प्रत्येक घटकाने अंगीकारायचे ध्येय आहे असे सांगत आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी प्रत्येक यंत्रणेला सज्जतेचे आणि समन्वयाचे आवाहन केले.