‘महावितरण'च्या स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक
कल्याण : ‘महावितरण'च्या स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्याला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्मार्ट मीटर लावण्यास रहिवाशांसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून, कल्याण पश्चिम मधील गौरीपाडा परिसरातील कैलास होम्स सोसायटीमध्ये सदर घटना घडली आहे. दरम्यान, स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे युवा सेना शहर अधिकारी गणेश नाईक यांनी दिला आहे.
कल्याण पश्चिम गौरी पाडा परिसरातील कैलास होम्स सोसायटी येथील नागरिकांनी स्मार्ट मीटरबाबत तक्रार केली असता, नागरिकांचा विरोध असताना देखील स्मार्ट मीटर लावण्याचे काम चालू असल्याने युवासेना शहर अधिकारी गणेश नाईक यांनी या कर्मचाऱ्यांना विरोध करत त्याच कर्मचाऱ्यांकरवी स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर लावून घेण्यात आले. यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे आभार मानले.
तसेच यापुढे कोठेही स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन युवा सेना शहर अधिकारी गणेश नाईक यांनी दिले आहे.