राज्यासह कल्याण-डोंबिवली मध्ये बार, परमिटरुम बंद

कल्याण : महाराष्ट्रातील हॉटेल-बार मालकांनी राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यव्यापी संप पुकारला. या बंदमध्ये सुमारे २२ हजार हॉटेल्स आणि बार यांचाही सहभाग आहे. तर कल्याण-डोंबिवली मधील सर्व बार हॉटेल यांनी १४ जुलै रोजी एक दिवसीय बंद पुकारत राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीचा ‘हॉटेल ओनर्स असोसिएशन, डोंबिवली'तर्फे निषेध करण्यात आला. तसेच असोसिएशनने बैठक आयोजित करुन सरकारने सदरचा वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली. सदर मागणीचे पत्र भाजप प्रदेश अध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांना देणार आहोत, असे ‘हॉटेल ओनर्स असोसिएशन, डोंबिवली'चे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले.

सदर बैठकीला अध्यक्ष अजित शेट्टी यांच्यासह सेक्रेटरी सत्येश शेट्टी, प्रभाकर शेट्टी, सूकुमार नायक, राजू भंडारी, सुकेश शेट्टी, किशोर शेट्टी, वि्ील शेट्टी, वीजीत शेट्टी सचिन शेट्टी तसेच हॉटेल मालक उपस्थित होते.

राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट ५ टक्क्यांवरुन १० टक्के केले असून परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली आहे. तर भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. सदरची कर वाढ रद्द करावी, अशी मागणी ‘हॉटेल ओनर्स असोसिएशन, डोंबिवली'तर्फे करण्यात आली. या करवाढीला विरोध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बार आणि हॉटेल व्यावसायिकांनी एक दिवस बार बंद ठेवले आहेत.

‘हॉटेल ओनर्स असोसिएशन, डोंबिवली'ची बैठक डोंबिवली मधील मॉर्डन प्राईड हॉटेल येथे पार पडली. यावेळी कल्याण- डोंबिवली मधील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. तर याबाबतचे पत्र भाजप प्रदेश अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र देणार आहोत, असे संघटनाचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, जर करवाढ झाली तर हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार असून, बार बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल-बार व्यवसायाशी संबंधित घटकांच्या रोजगारांवर सुध्दा याचा फटका पडणार असल्याचे ‘असोसिएशन'चे सेक्रेटरी सत्येश शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर हॉटेल व्यवसायिक गिरीश शेट्टी यांनी परमिट रुम आणि वाईन शॉप मधील करामध्ये तफावतता असल्याने ग्राहक ढाबे, चायनिज फुडच्या गाड्यांवर दारु घेऊन पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले. तसेच उघड्यावर सुध्दा दारू पिण्याचे प्रमाण वाढून सरकारला टॅक्स सुध्दा कमी मिळेल. यासाठी सरकारने करवाढ रद्द करण्याची मागणी गिरीश शेट्टी यांनी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ट्रक रिव्हर्स  घेताना पाण्याची पाईपलाईन फुटली