मिरा-भाईंदर मधील नालेसफाईसाठी ३१ मे ‘डेडलाईन'
भाईंदरः पावसाळयात मिरा-भाईंदर शहरात पाणी साचू नये यासाठी नाले सफाई योग्य पध्दतीने आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने एप्रिलपासून सुरु केलेले काम जवळजवळ ६५ टक्के पूर्ण झाले असून, ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने मिरा-भाईंदर शहरातील १५५ नाले सफाईसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली असून, मिरा-भाईंदर शहरातील ४५ सखल भागासाठी सक्शन पंपची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत लहान-मोठे १५५ नाले आहेत. त्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ, वेस्टर्न पार्क, पंजाब फौंड्री, मुंशी कंपाऊंड, लक्ष्मी पार्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने २० एप्रिल पासून नियोजनबध्द पध्दतीने नालेसफाई करण्यास सुरुवात केली होती. कनिष्ठ अभियंता,स्वच्छता निरीक्षक दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नालेसफाईचे काम सफाई कामगार पोकलन, बोट पोकलन, जेसीबी, डंपर इत्यादी साहित्यासह करत आहेत. अतीवृष्टी झाल्यावर मिरा-भाईंदर शहरातील सखल भागात पाणी भरत असते. त्यासाठी प्रशासनाने ४५ सक्शन पंपची व्यवस्था केली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील नालेसफाईचे काम नियोजनबध्द पध्दतीने विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार नालेसफाईचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे यावर्षी मिरा-भाईंदर शहरात पाणी तुंबण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाही. - डॉ.सचिन बांगर, उपायुक्त - मिरा-भाईंदर महापालिका.