एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात

वाशी : वाशी मधील ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या (एपीएमसी) नवीन संचालक निवडीसाठी निवडणूक प्रकिया सुरु करण्याची सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषि उत्पन्न बाजार समिती) तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना १ जुलै २०२५ रोजी दिली आहे. मात्र, एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला तरी देखील नवीन एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याने उद्या १ सप्टेंबर रोजी बाजार समितीवर प्रशासक नेमला जातो की नवीन एपीएमसी संचालक मंडळ निवडणुकीला मुदतवाढ दिली जाते?, याकडे बाजार समिती घटकांच्या नजरा लागल्या आहेत.

फेब्रुवारी-२०२० मध्ये एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक पार पडल्यानंतर ‘कोविड'मुळे ऑगस्ट-२०२० मध्ये एपीएमसी सभापतींची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट-२०२० पासून पकडण्यात आल्याने आज ३१ ऑगस्ट २०२५रोजी विद्यमान एपीएमसी संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात येणार असल्याने नवीन एपीएमसी संचालक मंडळ निवडीकरिता निवडणूक घेणे क्रमप्राप्त होते.त्यानुसार नवीन एपीएमसी संचालक निवडीसाठी निवडणूक प्रकिया सुरु करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषि उत्पन्न बाजार समिती) तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांना १ जुलै-२०२५ रोजी दिल्या आहेत. मात्र, सदर सूचना देऊन दोन  महिने झाले तरी एपीएमसी संचालक निवडणुकीबाबत काहीच हालचाली सुरु नसून, फक्त मतदार यादीवर काम सुरु असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी  १ जुलै २०२५ रोजी निवडणूक प्रकिया सुरु करण्याचे पत्र दिल्यानंतर लवकरच एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक लागेल, अशी आशा बाजार घटकांना होती.त्यामुळे एपीएमसी संचालक पदासाठी इच्छुक असलेल्यांनी बाजार आवारातील मतदारांच्या भेटीगाठी वाढवून अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात देखील व्ोÀली आहे. मात्र, आज ३१ ऑगस्ट रोजी एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी ना मतदार यादी प्रसिध्द केली ना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे नवीन एपीएमसी संचालक निवडणूक बाबत एपीएमसी बाजार आवारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एपीएमसी संचालक मंडळ निवडणुकीत राज्यातील १२ शेतकरी प्रतिनिधी, ५ वाशी मधील एपीएमसी मार्केट मधील व्यापारी प्रतिनिधी आणि १ कामगार प्रतिनिधी मिळून एकूण १८ एपीएमसी संचालकांसाठी निवडणूक होते. आज ३१ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यमान एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या जून महिन्यात कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांची निवडणूक पार पडली आहे. या नवीन संचालक मंडळ निवडणूक करिता बाजार समितीची मतदार यादी दीड महिना म्हणजे १४ मे २०२५ रोजी अंतिम करण्यात आली होती. त्यानंतर २९ जून २०२५ रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ आज संपणार असूनही अद्याप नवीन एपीएमसी संचालक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.

एपीएमसी संचालक मंडळ निवडणुकीकरिता मतदार याद्या आम्ही ठाणे निवडणूक अधिकारी (कृषि उत्पन्न बाजार समिती) तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दिल्या आहेत. एपीएमसी संचालक मंडळ निवडणुकीचे सर्व अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना असल्याने नवीन एपीएमसी संचालक मंडळ निवडणूक बाबत अद्याप का कार्यवाही  करण्यात आली नाही?, याची कल्पना बाजार समिती प्रशासनाला नाही. - डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सवात निर्माल्यातील फुलांपासून खतनिर्मिती उपक्रम