महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळे घड्याळी तासिका शिक्षकांना मिळाला न्याय
नवी मुंबई : घड्याळी तासिका शिक्षकांना नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुनर्नियुक्तीचे आदेश न दिल्याने संबंधित शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी वाचा फोडली. महापालिका आयुक्त व शिक्षण उपायुक्तांकडे पाठपुरावा करत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास रविंद्र सावंत यांनी आणून दिले. अखेरीस या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिल्याने शिक्षकांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे आभार मानले आहेत.
मानवतावादी दृष्टीकोन ठेवून महापालिका शाळेमध्ये काम करणाऱ्या घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे, शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त, शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे सातत्याने केली होती.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमिक शाळांना २०२३ साली शिक्षकांची कमतरता भासल्यानंतर पालिकेचे तत्कालिन आयुक्त यांनी शिक्षकांची जाहिरात देऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षकांची नवीन भरती केली. या शिक्षकांना महानगरपालिकेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. सदर शिक्षकांनी सलग दोन वर्ष महापालिका शाळेमध्ये सेवा केलेली आहे. या कालावधीत वाढत्या महागाईच्या काळात कमी वेतनामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. शासकीय सुट्टी, साप्ताहिक सूटटी अशा छोट्या आणि गणपती सूटटी, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या सर्व सुट्टयांमध्ये सदर शिक्षकांनी विनावेतन आपल्या कुटुंबाला व गरीब आई-वडीलांना मुंबईसारख्या शहरात सांभाळायचे काम केले आहे. या शिक्षकांना महापालिकेने दिवाळीसाठीचा सानूग्रह अनुदान ही दिलेले नसल्याचे रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.
बेरोजगारीचे भयंकर वास्तव सद्य:स्थितीत सर्वत्र आहे. अशा अवस्थेत स्वत:च्या गरीब आई वडील व कुटुंबांना सांभाळण्यासाठी सदर जाहिरातीने भरलेले गुणवत्ताधारक शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी पुनर्नियुक्ती देण्यासाठी महापालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला शिक्षकांची गरज आहे. या शिक्षकांना महापालिकेत शाळेत शिकविण्याचा अनुभव आहे. महापालिका शाळा सुरु होवून काही दिवस उलटले आहेत. महापालिका शाळेत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण येवू नयेत म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने निर्नय घेणे आवश्यक आहे. हे शिक्षक गावावरुन आलेले आहेत. भाड्याच्या घरात वास्तव्य करत आहेत. त्यांना नोकरीची व महापालिकेला शिक्षकाची गरज आहे. तासिका शिक्षकांवर अन्याय होवू नये ही आमची मागणी आहे. महापालिकेने मानवतावादी दृष्टीकोन ठेवून घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यासाठी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. घड्याळी तासिका तत्वावरील माध्यमिक व प्राथमिक ४० शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश महापालिका प्रशासनाने ३० जून रोजी दिल्याने महापालिका शाळेतील शिक्षक कमतरतेची समस्याही रविंद्र सावंत यांच्यामुळे निकाली निघाली आहे.