जल्लोष स्वच्छतेचा, विजयी रॅली उत्साहात संपन्न
भाईंदर : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५'मध्ये देशातील ३ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरात मिरा- भाईंदर शहराने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. याचे औचित्य साधून २ ऑगस्ट रोजी मॅक्सस मॉल ते मिरा भाईंदर महापालिका मुख्यालय या मार्गावर जल्लोष स्वच्छतेचा विजयी मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीपूर्वी उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करुन सदर राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
स्वच्छतेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिला सफाई कर्मचारी आणि पुरुष सफाई कर्मचारी यांचे प्रतिनिधी म्हणून ५ महिला आणि ५ पाच पुरूष सफाई कर्मचाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून आमदार मेहता आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर पुरस्कार सफाई कर्मचाऱ्यांना आणि शहरातील नागरिकांना समर्पित केल्याचे सांगून आयुवत शर्मा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा यथोचित सन्मान केला.
राष्ट्रपती पुरस्काराचा मिळालेला मान टिकवून ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. यासाठी ‘माझे शहर, माझा अभिमान' या भावनेने सर्व नागरिकांनी शहरात स्वच्छता राहील, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच सदर प्रथम क्रमांक कायम टिकवून ठेवण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका प्रशासन सतत प्रयत्नशील राहील, असे आयुवत राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.
सदर विजयी मिरवणुकीमध्ये मिरा-भाईंदर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांंबरोबरच शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी महिलांनी आयुक्त शर्मा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे औक्षण करुन अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन सफाई कामगारांच्या कार्याचा सन्मान केला. विशेष म्हणजे या विजयी मिरवणुकीच्या मार्गावर पुष्पवृष्टीने झालेली अस्वच्छता त्वरित स्वच्छ करण्यात आली.
आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या सदर विजयी मिरवणुकीत आमदार नरेंद्र मेहता, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी सभापती सुरेश खंडेलवाल, ध्रुवकिशोर पाटील, डॉ. सुशील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मु.) कल्पिता पिंपळे, मिरा-भाईंदर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर, सिस्टिम मॅनेजर तथा जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, सहा. आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) योगेश गुनजिन, माजी नगरसेवक, इतर महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीसी, अग्निशामक अधिकारी-कर्मचारी आणि विशेषत्वाने सफाई कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घ्ोतला. ‘जल्लोष स्वच्छतेचा विजयी मिरवणूक' मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली.