पलावा उड्डाणपुलाचे व्हीजेटीआय मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट
कल्याण : कल्याण-शिळफाटा मार्गावरील देसाई-निळजे-काटई (पलावा) या अत्यंत महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या कामात होत असलेल्या ढिसाळपणा, अर्धवट स्थिती आणि वाहतुकीस होणारा त्रास लक्षात घेता माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी १ जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळीच पुलाच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच निरीक्षणाच्या आधारावर राजू पाटील यांनी ३ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, व्हीजेटीआय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची अधिकृत मागणी केली होती.
या मागणीची शासनाने गंभीर दखल घेतली असून, ५ ऑगस्ट रोजी ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'मार्फत आदेश काढून व्हीजेटीआय संस्थेमार्फत ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
पलावा पुलाच्या कामावर केवळ एका महिन्यात खड्डे पडलेले दिसत आहेत, जे कामाच्या गंभीर हलगर्जीपणाचे आणि निकृष्ट दर्जाचे प्रतिक आहेत. अशा परिस्थितीत माजी आमदार राजू पाटील यांनी वेळेवर घेतलेली तांत्रिक आणि सार्वजनिकदृष्ट्या सजग भूमिका योग्य आणि आवश्यक ठरली आहे. यापूर्वीही कल्याण-शिळ रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत हरकत घेतल्यानंतर ३० पॅनल बदलण्याची नामुष्की ठेकेदारावर आली होती. या सर्व घटनांवरुन राजू पाटील यांची निरीक्षणशक्ती, तांत्रिक सजगता आणि विकासकामांबाबतची जबाबदारीची भावना अधोरेखित होते.