वीटभट्टी व्यावसायिकांचे गणित पुन्हा बिघडणार

भिवंडीः वीटभट्टी व्यवसायाला अच्छे दिन सुरु असतानाच सद्यस्थितीत परतीच्या पावसानंतर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे गणित यंदाही बिघडणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यामुळे अवकाळीने वीटभट्टी व्यवसायाला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने डिसेंबर पर्यंत वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाने व्यावसायिकही आर्थिक गर्तेत सापडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीटभट्टी व्यवसायाचा श्री गणेशा करायचा कधी? या पेचात व्यावसायिक सापडले आहेत.

अगोदरच अवकाळीने शेतकरी वर्गाला मेटाकुटीला आणलेले असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळख असलेल्या वीटभट्टी व्यवसायावरही अवकाळीचे गडद काळे ढग मागील काही दिवसांपासून चांगलेच फिरकत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात टेंभवली, जुनांदूरखी, लाखिवली, पालिवली, धामणे, चिंबीपाडा, पाये, पायगाव, खारबाव, मालोडी, खार्डी तसेच कोनगाव, पिंपळास, सुपेगाव, अंबाडी आदि गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात मातीच्या विटांचा वीटभट्टी व्यवसाय करतात. अगोदरच सिमेंट विटा तसेच सिफॉरेक्स विटांनी मातीच्या विटांचा व्यवसाय डबघाईला आला असून त्यानंतर आता अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टी मालकांवर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या आदिवासी मजुरांवर देखील आर्थिक संकट ओढवले आहे.

एकीकडे मागील २ वर्षांपासून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीटभट्टी व्यवसायाच्या सुरुवातीच्या शुभमुहूर्तावर अवकाळीने पाणी फेडला आहे. दुसरीकडे यंदाही परतीच्या पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांच्या दिवाळी मुहूर्तावर विरजण आणले आहे. त्यातच सध्या कटसाईट विटेला ९ हजार पेक्षा जास्त भाव आहे. ब्लॉकच्या विटेला १४ हजारहून अधिक भाव आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून वीटभट्टी व्यवसाय तेजीत जरी असला तरी यंदा पाऊस वीटभट्टी व्यवसायाला उतरती कला लावणार असेच काही उघड होत आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात काही वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यवसायाला सुरुवात केली असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने व्यावसायिकांचे अगोदरच नुकसान झाले आहे. काही व्यावसायिकांनी सतत अधूनमधून कधीही बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे एक्झिट घेतल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, वीटभट्टी व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने शासन दरबारी अनेकवेळा नुकसान भरपाईची मागणी केलेली असतानाही वीटभट्टी व्यावसायिकांच्या पदरी आतापर्यंत तरी निराशाच पडली आहे. त्यामुळे यावेळी वीटभट्टी व्यवसाय कधी सुरु करावा की नाही? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. एकंदरीतच वीटभट्टी व्यवसायाची गणिते बिघडणार असल्याची चिन्हे या अवकाळी पावसातून आणि हवामान विभागाच्या अंदाजातून नक्की होत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली