डोंबिवली मध्ये उद्या गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा; वाहतुकीत बदल
ठाणे : श्री गणेश मंदिर संस्था, डोंबिवली (पूर्व) या संस्था तर्फे उद्या ३० मार्च रोजी सकाळी गुढीपाडवा निमित्त डोंबिवली शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या शोभायात्रा निमित्ताने डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उद्या डोंबिवली शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) पंकज शिरसाट यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
सदर शोभायात्रा डोंबिवली (पश्चिम) येथील भागशाळा मैदान येथून सुरु होऊन कोपर ब्रीज मार्गे शिव मंदिर रोड - चार रस्ता - बाजीप्रभू देशपांडे चौक - फडके रोड मार्गे डोंबिवली (पूर्व) येथे समाप्त होणार आहे. या शोभायात्रेत लेझीम पथक, सनई चौघडा, भजन, दिंड्या, अनेक चित्ररथ असणार आहेत. तसेच या शोभायात्रेत डोंबिवली मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या शोभायात्रा निमित्ताने डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि शोभायात्रा परिसरातील वाहतूक सुरळीत चालू राहावी याकरिता उद्या गुढीपाडवा निमित्त डोंबिवली शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या शोभायात्रा कार्यक्रमात येणाऱ्या वाहनांसाठी नेहरु मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, असे पंकज शिरसाट यांनी सांगितले.
उद्या गुढीपाडवा निमित्त डोंबिवली शहरात करण्यात आलेल्या वाहतूक बदलाची अधिसूचना सकाळी ४ ते दुपारी १ या वेळेत अंमलात राहणार असून, या वाहतूक नियंत्रण अधिसूचना मधून पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे. - पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) - ठाणे शहर.
डोंबिवली शहरातील वाहतुकीत बदल
- शोभायात्रा निमित्ताने डोंबिवली मधील फडके रोडवरील बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक पर्यंत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना संपूर्ण फडके रोड येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून, या वाहनांसाठी ठाकुर्ली जोशी हायस्कूल समोरील रोडवरुन नेहरु रोड मार्गे डोंबिवली स्टेशनकडे तसेच फडके रोडकडे येणाऱ्या वाहनांसाठी टिळक रोड, सावरकर रोड, इंदिरा चौक मार्गे डोंबिवली स्टेशनकडे जाण्याचा मार्ग सुचविण्यात आला आहे.
- घरडा सर्कल (डोंबिवली पूर्व) कडून कल्याण रोडवरुन टिळक चौक कडे येणाऱ्या खाजगी बस आणि अवजड वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून, या वाहनांना घरडा सर्कल येथे यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जाता येणार आहे.
- डोंबिवली पश्चिम कडून कोपर ब्रीज मार्गे डोंबिवली पूर्व कडे जाणाऱ्या वाहनांना कोपर ब्रीज येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून, या वाहनांसाठी महात्मा फुले रोड मार्गे बावन चाळ, नवीन ठाकुर्ली ब्रीज वरुन डावे वळण घेऊन व्हीपी रोडवरुन इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग सुचविण्यात आला आहे.
- घरडा सर्कल (डोंबिवली पूर्व) येथून कल्याण रोडवरुन टिळक चौक मार्गे येणाऱ्या केडीएमटी आणि एनएमएमटी बसना टिळक रोड येथे प्रवेश बंद करण्यात येणार असून, या बसना आर. पी. रोड मार्गे चार रस्ता पाटणकर चौक येथून डावे वळण घेऊन मानपाडा रोड मार्गे इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग सुचविण्यात आला आहे.