आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर; आ.महेश बालदी यांचा पुढाकार
पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरु करण्यात आली असून, या बससेवेचा शुभारंभ मुंबई मधील विधान भवन येथे ‘भारतीय जनता पार्टी'चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले. या बससेवेमुळे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर झाला आहे.
या लोकार्पण सोहळ्याला आमदार महेश बालदी, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, खालापूर मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, पनवेल पश्चिम मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, गणेश कदम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
आ. महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी फिरता दवाखाना, घरकुल, सामाजिक सभागृह तसेच विविध पायाभूत सुविधा देण्याचे काम ते करत असून, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. बस सेवा कलोते मोकाशी ठाकूरवाडी, कलोते खोंडा ठाकूरवाडी, कलोते रयती ठाकूरवाडी या मार्गावर धावणार आहे. या उपक्रमामुळे संबंधित भागातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींची शालेय शिक्षणासाठी होणारी लांब पायपीट थांबणार असून, त्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर शाळेत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सेवेमुळे केवळ शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला नाही, तर आदिवासी समाजातील पालकांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक विश्वास आणि प्रोत्साहन मिळाला आहे. या उपक्रमासाठी जे. एम. बक्षी यांचे सहकार्य लाभले आहे.
आदिवासी समाज दुर्गम भागात राहतो. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बससेवा उपक्रमातून होत आहे. त्यामुळे आ. महेश बालदी यांनी राबविलेला उपक्रम अत्यंत स्त्युत्य आणि प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आ. महेश बालदी यांनी आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी बससेवा सुरु करुन केली आहे, असे गौरवोद्गार यावेळी ना. डॉ. अशोक उईके यांनी काढले.