नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात नागपूर तसेच महिला गटात पुणे विजयी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 21 ते 23 मार्च या कालावधीत महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन, नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी यांच्या सहयोगाने ‘नवी मुंबई महापालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.

पुरुष गटात सहभागी 16 जिल्हयांच्या नामांकित संघांमधून नागपूर संघाने अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघावर 25:20, 25:19, 25:17 अशी सलग तीन सेटमध्ये मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

महिला गटात 8 जिल्हयांच्या सहभागी संघांमधून पुण्याच्या महिला व्हॉलीबॉल संघाने नागपूरच्या महिला व्हॉलीबॉल संघावर 25:23, 25:17, 25:30 अशी सलग तीन सेटमध्ये मात करित अजिंक्यपद पटकावले.

नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे – पाटील, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजयभाऊ डांगरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, उपाध्यक्ष धनंजय वनमाळी, सचिव संजय नाईक, सहसचिव निलेश जगताप, कोषाध्यक्ष अरविंद गवई, बुलढाणा जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाब राठोड, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू स्वामीनाथन तसेच विभागांच्या असोसिएशनचे सचिव, पदाधिकारी आणि स्पर्धा संयोजक किरण स्टेनली व ठाणे जिल्हा असोसिएशनचे सचिव .किरण बावस्कर, आशिष ओबरॉय आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सांघिक व वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धांचा शुभारंभ संपन्न झाला होता.

या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात पुणे संघ तृतीय क्रमांकाचा व मुंबई शहर संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.

महिला गटात नाशिकच्या संघाने तृतीय व मुंबईच्या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

पुरुष गटात सांगली, लातुर, अकोला व धाराशीव हे चार संघ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले.

पुरुषांमध्ये नागपूर संघाचा व्हॉलीबॉलपटू केवल बराई तसेच महिलांमध्ये पुणे संघाची व्हॉलीबॉलपटू मृणाल आगरकर मालिकावीर (Man / Women of the Tournament) किताबाचे मानकरी ठरले.

पुरूषांमध्ये मुंबई उपनगर संघाचा सय्यद मुबारक तसेच महिलांमध्ये नागपूर संघाची जयश्री ठाकरे बेस्ट ॲटॅकर पुरस्काराने नावाजले गेले. बेस्ट सेटर म्हणून पुरुषांमध्ये नागपूर संघाचा हेमंत छारडे व महिलांमध्ये पुणे संघाची रश्मी कदम वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित झाली.

स्पर्धा स्थळाला महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेवराव शिरगावकर तसेच उपाध्यक्ष ध्यानचंद पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू प्रदीप गंधे, असोसिएशनच्या सदस्य तथा अर्जुन पुरस्कारप्राप्त स्मिता शिरोळे व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. उदय डोंगरे या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिका-यांनीही भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व महापालिकेच्या उत्तम आयोजनाचे कौतुक केले.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

विक्रम अधिकारी कांस्यपदकाचा विजेता