पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक लाचखोरी प्रकरणात अटकेत

पनवेल : रायगड अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी यशस्वी सापळा रचून पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (42) याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईत त्याच्यासोबत खाजगी व्यक्ती रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (30) याला देखील अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 465, 420, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर यांनी कलम वाढवून तक्रारदाराच्या वडिलाना पुन्हा अटक करण्याची धमकी दिली होती. तसेच तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेत रायगड अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करताना पोलीस उपनिरीक्षक वायकर यांनी तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने सापळा लावला होता. 

यावेळी खाजगी व्यक्ती रविंद्र बुट्टे याने वायकर यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून 50 हजाराची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.

ही कारवाई रायगड अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, नारायण सरोदे, सहा. फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस शिपाई नवदीप नांदगावकर आदींच्या पथकाने केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

३.७७ कोटींचा गुटखा जप्त, ४ आरोपी अटकेत