पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
कल्याण : कल्याण पश्चिम मधील खडकपाडा चौकात असणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. सदर ठिकाणी पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरु असून त्याची भूमीगत केबल टाकताना मुख्य जलवाहिनी डॅमेज झाल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कल्याण पश्चिम मधील खडकपाडा सर्कल येथून ‘केडीएमसी'ची ७५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. सदर ठिकाणी भूमीगत केबलच्या खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी २२ जून रोजी पहाटेच्या सुमारास डॅमेज झाल्याने तेथे पाण्याचा मोठा फवारा उडत होता. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती काम सकाळी १२ वाजेपर्यंत पूर्ण केले. यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत सुरळीत केल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली.