नाल्यातील सांडपाणी थेट उल्हास नदीत

कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील घरगुती औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया उल्हास नदीत सोडले जात असल्याने उल्हास नदीचे पात्र प्रदुषित होत आहे. त्याचबरोबर उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी काढण्याचे काम ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडून सुरु आहे. दरम्यान, उल्हास नदीपात्रात २ नाल्यांमधून पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दुषित होत असल्याने या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेला ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, इतर नगरपालिकांकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडून सुरु असून यानंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे ‘मंडळ'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदी पात्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील घातक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याने नदी पात्र प्रदुषित होत आहे. प्रदुषणाचा धोका वाढत असल्याने तसेच नदी पात्राला जलपर्णींचा विळखा घट्ट होत असल्याने याविरोधात ‘मी कल्याणकर संस्था'ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नदीपात्र स्वच्छतेसाठी थेट १० दिवस नदीपात्रात आंदोलन छेडत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला होता. यानंतर ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले असून मागील काही दिवसात नदी पत्रातील जलपर्णी काही प्रमाणात काढण्यात ‘मंडळ'ला यश आले आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेसह इतर नगरपालिकांकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडून सुरु आहे. तद्‌नंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे ‘मंडळ'चे अधीक्षक अभियंता जयवंत हजारे यांनी सांगितले. तर नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत महापालिकांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा जाणार आहेत, याबाबतची माहिती संबंधितांकडून घेऊन या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही हजारे यांनी सांगितले.

जलपर्णी काढण्याचे काम आठवडाभरापासून सुरु असून नदीपात्रातील जलपर्णी पूर्णपणे काढली जाईल. तसेच घरगुती सांडपाणी नदीपात्रात सोडल्याबाबत ‘केडीएमसी'ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
-जयवंत हजारे, अधीक्षक अभियंता, प्रदुषण नियंत्रण मंडळ. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१५ दिवस अगोदरच मासेमारी बंद; माशांचे भाव गगनाला भिडले