आदिवासी समाजाच्या वन विभागीय समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक - ना. गणेश नाईक
पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या वन विभागाशी संबंधित दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मतदारसंघातील विविध गावांतील समस्या, मागण्या, आणि प्रस्तावांचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. बैठकीत ना. गणेश नाईक यांनी या मागण्यांचा गांभीर्याने आढावा घेत संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल ,असा सकारात्मक प्रतिसाद दिला.
पनवेल तालुक्यातील आपटा येथील घेरावाडी वाडीला अभयारण्य अंतर्गत स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची मान्यता मिळालेली आहे. मात्र, प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची मान्यता आवश्यक आहे. ती तात्काळ मिळावी, अशी मागणी करण्यात आली. गुळसुंदे गावातील डोंगरीचीवाडी दरडग्रस्त क्षेत्रात येते. येथील नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता धोक्यात आहेत. त्यामुळे या वाडीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठवण्याची मागणी झाली. चिंचवण लेंडेवाडी येथील ३/२ प्रस्तावाला मान्यता मिळावी, साई येथील आश्रमशाळेसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या शहानिशेची प्रक्रिया रखडली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि योग्य निर्णय घ्यावा.
कर्नाळा हद्दीतील सर्व्हे क्र.९/२ अ या सातबाऱ्यावरील इतर हक्क महाराष्ट्र खाजगी वने अधिनियम ६३१ नोंद रद्द करण्यासंदर्भात शाहनिशा करून योग्य तो निर्णय मिळावा. मोदीमाल (सवणे) येथील वाडीला रस्ते, पाणी, वीज अशा मुलभूत सुविधा मिळण्यासाठी ३/२ प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्याला मान्यता देऊन काम सुरू करावे. कर्नाळा घेरावाडी येथील महिलांच्या बचत गटाला स्वावलंबनासाठी खादी ग्रामोद्योगचा स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खालापूर तालुक्यातील हाशाचीपट्टी वाडीतील आदिवासी समाजाला पायाभूत सुविधा मिळण्यासाठी फॉरेस्ट कॉन्सर्व्हेशन ॲक्ट अंतर्गत तात्काळ प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पाठवावा, अशा मागण्या, प्रलंबित प्रस्ताव, स्थानिक समस्यांवर बैठकित सविस्तर चर्चा झाली.
आदिवासी समाजाचा हक्क, वन हक्क कायदा, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली स्थलांतराची गरज, वन विभागाची नियमावली या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन नामदार नाईक यांनी दिले.