वडोल ग्रामस्थ पाणी समस्येने त्रस्त  

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका हद्दीत असलेले आणि पॅनल १२ मधील वडोल गांवात ४ महिन्यापासून पाणी समस्या निर्माण झाली असून नवीन पाईपलाईन टाकून सुध्दा पाणी येत नाही. त्यामुळे या ४ दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर वडोल गांवच्या नागरिक आणि महिलांच्या वतीने महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेविका सविता तोरणे आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल १२ मधील वडोल गांवात गेल्या ४ महिन्यापासून पाणी येत नाही. काही नागरिकांनी गढुळ पाणी येत असल्याची तक्रार केली होती. महापालिकेने तपासणी न करता रस्ता खोदून नवीन पाईपलाईन टाकली. पण, समस्या न सुटता उलट ती अत्यंत गंभीर बनली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन टाकली असुन चारही बाजुनी नविन रस्ते खोदुन ठेवले आहेत. त्यामुळे येथील नागरिकाना चालणे सुध्दा कठीण झाले आहे.

नवीन पाईप लाईन टाकण्यापूर्वी पाणी येत होते मात्र काही ठिकाणी गढूळ होते आता तर काही ठिकाणी अजिबात पाणी येत नसल्याने नागरिकांसह महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान, येत्या ४ दिवसात वडोल गांवची पाणी समस्या सुटली नाही तर वडोल ग्रामस्थ आणि महिलांचा हंडा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका सविता रगडे आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जीर्ण इमारतीच्या छताचा प्लास्टर कोसळला; २ महिलांसह मुलगा जखमी