सिडको एमडी सिंघल यांच्याकडून खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड, गृहनिर्माण प्रकल्पांचा आढावा

नवी मुंबई : ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी खारघर तुर्भे टनेल लिंक रोड आणि खारघर येथील सिडको गृहनिर्माण योजना या प्रकल्पांना २९ एप्रिल रोजी भेट दिली. या प्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, डॉ. राजा दयानिधी, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व विशेष प्रकल्प) शीला करुणाकरण, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी, अधीक्षक अभियंता संतोष ओंभासे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘सिडको'तर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील शीव-पनवेल द्रुतगती महामार्गापासून ते खारघर येथील सेंट्रल पार्क उद्यानापर्यंत अंदाजे ५.४९० कि.मी. लांबीचा चार पदरी बोगदा मार्ग प्रस्तावित आहे. या ५.४९० कि.मी. लांबीच्या मार्गात १.७६३ कि.मी. लांबीच्या बोगद्याचा समावेश असणार आहे.

तसेच खारघर, नवी मुंबईतील एक अग्रगण्य निवासी नोड असून ‘सिडकोच्या सुयोग्य नियोजनामुळे येथे उत्कृष्ट जीवनशैलीचा अनुभव घेता येतो. सुसज्ज गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सदर परिसर दर्जेदार आणि उच्चभ्रू जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो आहे. या गोष्टी लक्षात घेता ‘सिडको'तर्फे खारघर स्थानकाशेजारी परिवहन केंद्रित गृहनिर्माण योजना हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, सदर पाहणी दौऱ्यात व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी दोन्ही प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काम अधिक वेगाने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील पाणथळी जागांचे जागतिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित