बहुचर्चित उल्हास नदी विसर्जन घाट प्रकल्प अडचणीत

उल्हासनगर : भाजप आमदार कुमार आयलानी यांचा बहुचर्चित विसर्जन घाट प्रकल्प अडचणीत सापडला आहे. उल्हास नदीच्या काठावर आणि ॲन्टीलिया गृह संकुलाच्या बाजुला निर्माणधीन असलेल्या घाटाच्या बांधकामास लघुपाटबंधारे विभागाने आक्षेप घेतला असून, बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नदीच्या पात्रात अतिक्रमण करुन २०२२ मध्ये घाटाचे बांधण्यास सुरु करण्यात आले होते. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सरिता खानचंदानी या सातत्याने पाठपुरावा करीत असून त्यांनी उल्हासनगर महापालिका प्रशासन, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार निधीतून ८ कोटी रुपये या विसर्जन घाट आणि अन्य कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. उल्हास नदी देशातील सर्वात प्रदुषित नद्यांपैकी एक असल्याचे सरकारच्या अहवालातच म्हटले आहे. नदी स्वच्छ करण्याचे सोडून त्यात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करुन सदरचा घाट बनविला जात आहे. यासाठी असंख्य झाडांची कत्तल झाली असल्याचा आरोप खानचंदानी यांनी केला आहे.

या घाटामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन त्याचा फटका म्हारळ, कांबा, वरप तसेच आजुबाजुच्या गृहसंकुलात असलेल्या रहिवाशांना बसेल. लघु पाटबंधारे विभाग यांनी सदरचेे काम पाडण्याचे आदेश दिलेले असताना अद्यापही काम बंद झालेले नाही. त्यामुळे पुरामुळे वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्यास त्यास आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महापालिका आणि संबंधित विभाग जबाबदार असतील, असा इशारा सरिता खानचंदानी यांनी दिला आहे.

उल्हासनगर शहरातील ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे नेते दिलीप मिश्रा यांनी आरोप केला आहे की, विसर्जन घाटाच्या नावाखाली आमदार आयलानी स्वतः बेकायदेशीर काम करीत आहेत. संबंधित विभागाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, उल्हास नदीचे सीमांकन अद्याप झालेले नाही. त्यामुळे नदीच्या सीमारेषेच्या आत झालेली कोणतीही बांधकामे अनधिकृत ठरवली जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे.

उल्हास नदी परिसरात कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही. नदीच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी घाट उभारण्यात येत आहे. सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच काम केले गेले आहे.
-आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२ दिवसांच्या ‘पाणीबाणी'मध्ये आरओ प्लांटचा धंदा तेजीत