एक तास वाचनाचा
नवी मुंबई : पुस्तके वाचल्याने आपले शब्दभांडार वाढते, कोणत्याही विषयावर ऐनवेळी बोलता येऊ शकते. तसेच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे वेळ काढून दिवसभरात पुस्तकातील काही पाने तरी वाचावीत असे सांगत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कार्यालयीन कामकाजासाठी केल्या जाणाऱ्या वाचनाच्या पलिकडे जाऊन अवांतर वाचनामुळे होणारे अनेक फायदे सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी साजरा करण्यात येणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिन' निमित्त ‘एक तास वाचनाचा' असा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त पवार यांनी पुस्तके वाचनाचे महत्व अधोरेखीत करीत आपल्या आवडत्या पुस्तकांविषयी तसेच पुस्तक वाचनामुळे विविध प्रसंगी झालेला लाभ याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, सहा.आयुक्त अरुण पाटील, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या शासकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालयीन कामकाजात आलेले विविधांगी अनुभव कथन करीत अतिरिक्त आयुक्त पवार यांनी स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्याकडून ‘काय वाचावे?' याविषयी मिळालेल्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्याच सल्ल्यामुळे स्व.यशवंतराव चव्हाण यांची सर्व पुस्तके मनापासून वाचल्याचे सांगत ‘यशवंतराव चव्हाण-विधीमंडळातील निवडक भाषणे' या पुस्तकाचा जीवनात विविध प्रसंगी झालेला उपयोग त्यांनी सांगितला.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासारख्या थोर विचारवंताची पुस्तके आपण आवर्जुन वाचली पाहिजेत. वयाच्या विविध टप्प्यांवर चांदोबा पासून सुरु झालेला वाचनाचा प्रवास महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून वैचारिक पुस्तकांपर्यंत कसा झाला याचे अनुभव कथन त्यांनी केले.
दररोज सोशल मिडीयावर दिल्या जाणाऱ्या वेळेतील काही वेळ आवर्जुन काढून तो वाचनासाठी देणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हितावह असेल असे सांगतांना पुस्तक वाचल्यानंतर सारांक्ष लेखनाची सवय लावून घ्या, असाही सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
याप्रसंगी उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी पुस्तके सर्वोत्तम मित्र असल्याचे सांगत वाचनामुळे आपण समृध्द होतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यातही दिसून येतो, असे सांगितले.
महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी वसंत कानेटकर लिखीत ‘प्रेमाच्या गावा जावे' या आपल्या आवडत्या नाटकाच्या पुस्तकाबद्दल आणि त्या नाटकात महाविद्यालयीन काळात अभिनय केल्याचे अनुभव कथन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी व नागरिक यांनी ‘एक तास वाचनाचा' या अभिनव उपक्रमात सहभागी होत ग्रंथालय विभागामार्फत ज्ञानकेंद्रात उपलब्ध करुन देण्यात आलेली विविध वाचनीय पुस्तके पाहिली आणि त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाच्या वाचनाचा लाभही घेतला.
दरम्यान, महापालिका मुख्यालयाप्रमाणेच ‘नमुंमपा'ची ३१ ग्रंथालये तसेच शहरातील महापालिकेसह खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे उत्साहाने आयोजन करण्यात आले होते.