कृत्रिम तलाव एक नवीन संकट

कृत्रिम तलाव, लोखंडी भांडे डासांसाठी नवीन उत्पत्तीस्थान; ठाणेकरांना भिती

ठाणे : ठाणे मध्ये डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली महापालिकेने बांधलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी भांडे आता डासांसाठी नवीन उत्पत्तीस्थान बनत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. विसर्जनानंतर साचणारे दुषित पाणी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करते.

विसर्जन काळात अनेक तलाव रिकामे करण्यात आले होते, तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जित केल्यानंतर पाणी दुषित होते. काही पात्रांमध्ये या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याचा गंभीर धोका आहे. ठाणेमध्ये शेकडो नागरिक आधीच डेंग्यू आणि मलेरियाने ग्रस्त असताना, महापालिकेच्या ‘पर्यावरणपूरक प्रयोगामुळे' साथीचे आजार पसरतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

जर विसर्जनानंतर लगेचच तलाव आणि भांडी रिकामी करुन निर्जंतुकीकरण केले नाही तर ‘पर्यावरणपूरक' या नावाखाली सुरु असलेला प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ‘घातक' ठरेल. नागरिकांच्या कर पैशातून बांधलेली सदर सुविधा प्रत्यक्षात अधिक आजारांना कारणीभूत ठरेल.तेे आकर्षणाचे कारण बनत असून सदर बाब दुर्दैवी असल्याचेही म्हटले जात आहे.

महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर लगेचच टाके आणि कंटेनर रिकामे करुन त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात ते दिवसेंदिवस असेच पडून आहेत. नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन त्यांना गांभीर्याने  घेत असल्याचे दिसत नाही.

गेल्या काही आठवड्यांपासून ठाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. कृत्रिम तलावांच्या टाक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या अळ्यांची संख्या वाढेल, ते उघड आहे. त्यामुळे येत्या काळात या आजारांचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी महापालिका पर्यावरणाच्या नावाखाली खेळ खेळत असल्याचा आरोप करीत शेवटी आपण ठाणेकरांनाच त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट केले आहे.

जर सरकार आणि महापालिकेला खरोखरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल, तर केवळ दिखाव्याच्या सुविधा उभारण्याऐवजी त्याची शास्त्रोक्त आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा, येत्या काळात पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळल्याबद्दल प्रशासनाला दोषी ठरवले जाईल.
-डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण संशोधक. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली