धरण उशाला अन् कोरड घशाला
उरण : उरण तालुक्यातील रानसई गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच उरण शहर, गावांना पाणीपुरवठा करणारा रानसई येथील डोंगर भागात धरण आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी गत रानसई ग्रामस्थांची झाली आहे. काही वर्षांपासून पेयजल तसेच ‘जल जीवन योजना'चे काम रखडल्याने टंचाईत भर पडली आहे. ग्रामस्थांना तलावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. तसेच हात पंपावरुन पाणी भरावे लागत आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असतानाही रानसई ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीत मध्ये खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खोंड्याची वाडी या ६ वाड्यांमध्ये १४०० पर्यंत १०० टक्के आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे. या वाड्यांपैकी २ वाड्यांमधील महिला वर्ग एकाच हापशी वरुन पाणी भरत आहेत. हापशी वर एक-एक हंडा भरण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. मजुरी करुन पोट भरणाऱ्या आदिवासी महिलांना मजुरी सोडून पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे. भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने अनेक वेळा योजना मंजूर केल्या. परंतु, शासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरच्या योजनाची कामे रेंगाळत पडली आहेत. त्यामुळे रांनसई आदिवासी बांधवांची अवस्था धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशीच निर्माण झाली आहे.
पावसाळामध्ये वापरण्यासाठी पाणी मिळते. परंतु, उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी झगडावे लागते. एक हपशी आहे, त्या हपशीवर २ वड्या पाणी भरतात. एक-एक हंडा भरायला १५ मिनिटे लागतात. पाण्यासाठी अनेक महिलांना मजुरीला मुकावे लागते. २ दिवसापूर्वी ट्रँकर सुरु झाले; मात्र तेही पाणी आम्हाला पुरत नाही. तरी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-सोमी मंगल्या दोरे, ग्रामस्थ-खैरकाठी वाडी, रानसई.